पुणे

Pune News : नव्या पोलिस आयुक्तांसमोर आव्हानांचा डोंगर !

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील सट्टेबाजी उघड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे पोलिस अधिकारी अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर शहरातील गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर वाहतूक समस्या, तसेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अमितेश कुमार यांना काम करावे लागणार आहेत.

अमितेश कुमार भारतीय सेवा पोलिस सेवेतील 1995 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मावळते पोलिस आयुक्त रितेश कुमार 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार रितेश कुमार यांची गृहरक्षक दलाच्या महासमादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मितभाषी आणि शांत अशी प्रतिमा असलेल्या रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022 रोजी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली होती. शहरातील गु्न्हेगारीचा बीमोड करण्यासाठी गुंडांविरुद्ध 'मोक्का' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) आणि 'एमपीडीए' (झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याचा) कारवाईचा प्रभावी वापर त्यांनी केला.

रितेश कुमार यांनी शहरातील 115 गुंड टोळ्यांचे म्होरके आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई केली. सहाशेहून अधिक गुंड टोळ्यांमधील सराइतांवर मोक्का कारवाई करण्यात आली. 'एमपीडीए' कायद्यान्वये दहशत माजविणार्‍या शंभर गुंडांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. रितेश कुमार यांच्या कारवाईमुळे गुंडांना जरब बसली. अमितेश कुमार हे नागपूर पोलिस आयुक्त होते. नागपूर शहरात 2005 ते 2006 या कालावधीत ते पोलिस उपायुक्त होते. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आणला होता. सट्टेबाजीत दाऊद इब्राहिम टोळीतील सराइत सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. अमितेश कुमार यांची पहिल्यांदाच पुणे शहरात नियुक्ती झाली आहे.

नागपूरच्या तुलनेत पुण्याचा विस्तार मोठा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गु्न्हेगारी वाढत असून, संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान अमितेश कुमार यांच्यासमोर आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अमितेश कुमार यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरणातील अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून वाहतूक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुंबई, ठाण्यानंतर पुणे शहरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालणे, तसेच गु्न्ह्यांची उकल करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यांची संख्या, तसेच तांत्रिक, पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी सातत्याने गृहविभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी लागणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT