मलेशियात सुलतान इस्कंदर बनले पाच वर्षांसाठीचे राजे | पुढारी

मलेशियात सुलतान इस्कंदर बनले पाच वर्षांसाठीचे राजे

क्वालालंपूर : लोकशाहीत संविधानिक पदे पाच वर्षांची असतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र, राजाही पाच वर्षांसाठी नियुक्त केला जात असेल असे आपल्याला वाटणार नाही. मलेशियात मात्र अशी अनोखी पद्धत आहे. आता मलेशियातील जोहोर राज्यातील सुलतान इब्राहिम इस्कंदर देशाचे नवीन राजे बनले आहेत. बुधवारी सुलतान इस्कंदर यांचा शपथविधी सोहळा पार पडला. पुढील 5 वर्षांसाठी त्यांची राजा म्हणून निवड झाली आहे. 1957 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य ळाल्यापासून, मलेशियातील मलय राज्यांच्या राज्यकर्त्यांनी पाच वर्षांच्या कालावधीसाठी फिरत्या आधारावर सिंहासन धारण केले आहे.

65 वर्षीय इस्कंदर जोहोरच्या राजघराण्यातील आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार त्यांच्याकडे 47.33 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. याशिवाय सुलतान यांच्याकडे 300 आलिशान कार आहेत. सुलतान यांच्याकडे बोईंग 737 सह अनेक खासगी जेट आहेत. रिपोर्टस्नुसार, सुलतान इस्कंदर यांच्या कुटुंबाकडे एक खासगी सैन्यदेखील आहे. मलेशिया व्यतिरिक्त, सुलतान यांच्याकडे सिंगापूरमध्ये 4 अब्ज डॉलर्स किमतीची जमीन, टायसॉल पार्क आणि बोटॅनिकल गार्डन आहे.

सुलतान इब्राहिम यांच्याकडे रिअल इस्टेट आणि खाणकामापासून दूरसंचार आणि पाम तेलापर्यंत अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी आहे. त्याचे अधिकृत निवासस्थान इस्ताना बुकीत सीरिन आहे, जे त्यांच्या अफाट संपत्तीचा पुरावा आहे. सुलतान इस्कंदरकडे यांच्याकडे बाईकचेही मोठे कलेक्शन आहे. सुलतान इब्राहिम यांच्या पत्नीचे नाव जरीथ सोफिया आहे. त्या राजघराण्यातील आहे. ऑक्सफर्डमध्ये शिकलेल्या सोफिया व्यवसायाने लेखिका असून, त्यांनी मुलांसाठी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. सुलतान आणि सोफिया यांना पाच मुलगे आणि एक मुलगी आहे. सुलतान यांचा मोठा मुलगा आणि मलेशियाचा क्राऊन प्रिन्स टुंकू इस्माईल भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहे. सिंगापूरची न्यूज एजन्सी द स्ट्रेटस् टाइम्सच्या वृत्तानुसार, 2007 मध्ये टुंकू इस्माइल भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणारा पहिला परदेशी बनला होता.

मलेशियामध्ये राजा कसा निवडला जातो? मलेशियात दर 5 वर्षांनी राजा बदलतो. मलेशियामध्ये 13 राज्ये आणि 9 राजघराणी आहेत. त्यांचे प्रमुख 9 राज्यांचे सुलतान आहेत, जे 5-5 वर्षांसाठी राजे बनतात. मलेशियामध्ये राजा बनण्याचा मार्ग आधीच ठरलेला आहे. असे असूनही, गुप्त मतदान होते. यामध्ये मतपत्रिकेचा वापर होतो. प्रत्येक सुलतानाने हे सांगणे आवश्यक आहे की नामनिर्देशित व्यक्ती राजा होण्यासाठी योग्य आहे का? राजा होण्यासाठी उमेदवाराला बहुमत मिळाले पाहिजे. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यावर सुलतानांसमोर मतपत्रिका नष्ट केल्या जातात.

Back to top button