Parking Pudhari
पुणे

Pune Parking Policy: पुण्यात स्वतंत्र पार्किंग धोरण लागू होणार; विमाननगर, लक्ष्मी रस्त्यापासून सुरुवात

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुख्य चौकांपासून १५ मीटरपर्यंत पार्किंग बंदी; मल्टी-स्टोरेज पार्किंगलाही चालना

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील वाढती वाहतूक कोंडी अन्‌‍ रस्त्यांवरील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिका लवकरच स्वतंत्र पार्किंग धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. या धोरणाचे सादरीकरण स्थायी समितीसमोर करण्यात येणार असून, मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. प्रारंभी हे धोरण विमाननगर आणि लक्ष्मी रस्ता परिसरात राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यावर उपाय म्हणून पार्किंगसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली असून, कोणत्या ठिकाणी पार्किंगला परवानगी द्यायची, कुठे पार्किंग पूर्णपणे बंद ठेवायचे, मुख्य चौकांजवळ किती अंतरापर्यंत पार्किंगला मुभा द्यायची, याचे स्पष्ट निकष या धोरणात निश्चित केले जाणार आहेत.

रस्त्याच्या रुंदी लक्षात घेऊन पार्किंगची क्षमता निश्चित केली जाणार आहे. फुटपाथ आणि मुख्य वाहतूक मार्ग अडथळामुक्त केले जाणार आहेत. या धोरणाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिस, आरटीओ, पीएमपीएमएल आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय ठेवला जाणार आहे. पार्किंग व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे राहील. पालिका मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा पुरवेल.

...असे असेल धोरण

नव्या धोरणानुसार, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अत्यंत कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. मुख्य चौकात पार्किंग कुठे असावे आणि कुठे नसावे, याचे स्पष्ट नियोजन केले जाणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरू नये म्हणून मुख्य चौकापासून 15 मीटर अंतरापर्यंत पार्किंगला पूर्णपणे बंदी असणार आहे. तसेच, काही महत्त्वाच्या आणि गर्दीच्या रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी मल्टी-स्टोरेज पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा भार कमी होऊन नागरिकांना नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत मिळणार आहे.

30 जूननंतरच धोरणाला मिळणार अंतिम मंजुरी

महापालिकेने नव्या धोरणाचे काम प्राथमिक स्तरावर पूर्ण केले असले, तरी सध्या लागू असलेल्या आचारसंहितेमुळे हे धोरण अंतिम मंजुरीसाठी थेट 30 जूननंतर जनरल बॉडीसमोर जाण्याची शक्यता आहे. आचारसंहितेचा काळ संपताच या धोरणाला गती मिळण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT