

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026 मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटी प्रवेश परीक्षा दि. 11 ते 20 एप्रिल 2026 रोजी पार पडली. या सीईटीच्या परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप दिनांक 20 मेपासून ते 22 मेपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
राज्यात पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीसाठी 4 लाख 79 हजार 334 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 54 हजार 079 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला 94.73 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर दि. 20 मेपासून ते 22 मेपर्यंत उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याला या सीईटी प्रवेश परीक्षेत दिलेल्या प्रश्नावर आणि उत्तरावर आक्षेप नोंदवता येईल.
जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्नावर किंवा उत्तरावर आक्षेप असेल, तर आक्षेप ट्रॅकिंग पर्यायाद्वारे आक्षेप नोंदवू शकतो. वरील तारखेमध्येच विद्यार्थ्याला त्याच्या लॉगिनद्वारे आक्षेप सादर करता येईल. विद्यार्थ्याला प्रतिप्रश्न प्रती आक्षेपासाठी लागणारी रक्कम ऑनलाईन लॉगिनद्वारे भरावी लागेल. ई-मेलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले प्रश्न आणि उत्तरांसंबंधीचे निवेदन, तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेमध्येच सीईटी प्रवेश परीक्षेतील प्रश्नावर आणि उत्तरावर काही आक्षेप असतील, तर ते या ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे नोंदवावेत, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.