

पुणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. प्रशासनाने यावेळी मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यावर भर दिला.
बैठकीत पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमधील दुरुस्त्यांसाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
मतदान केंद्रस्तरावर प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये समन्वय राखून काम करण्याचे आवाहनही करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यावेळी मीनल कळसकर यांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असताना मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.