SPPU Pudhari
पुणे

Pune University Issues Guidelines: चौथ्या वर्षाच्या पदवीसाठी पुणे विद्यापीठाची मार्गदर्शक सूचना जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत ऑनर्स व रिसर्च पदवीबाबत मार्ग मोकळा; स्वायत्त महाविद्यालयांना दिले दिशानिर्देश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली असून, चौथ्या वर्षाला सुरुवात झाली आहे. परंतु अद्याप चौथ्या वर्षांच्या ऑनर्स पदवी, ऑनर्स विथ रिसर्च पदवीबाबत विद्यापीठाकडून स्वायत्त महाविद्यालयांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नव्हते. यासंदर्भात अधिसभेत आवाज उठवला गेला. अखेर विद्यापीठाने मार्गदर्शक सूचना जाहीर करून संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेत स्वायत्त महाविद्यालयांच्या चार वर्षे पदवी अभ्यासक्रमाबाबत डॉ. बाळासाहेब सागडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 23- 24 पासून पदवीस्तरावर सुरू झाली आहे.

शैक्षणिक वर्ष 26 -27 पासून सर्व स्वायत्त महाविद्यालयात पदवीचे चौथे वर्ष सुरू होणार आहे. चौथ्या वर्षाची ऑनर्स पदवी, ऑनर्स विथ रिसर्च पदवी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाने पदव्युत्तर पदवी व ऑनर्स पदवी प्रवेश द्यावयाच्या विषयांची प्रवेशक्षमता अजून निश्चित केलेली नाही.

तसेच त्यासाठी पात्रता काय असेल, याबाबतही निर्णायक भूमिका घेण्यात आली नसल्याचे अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणले. विद्यापीठाने चौथ्या वर्षाच्या मार्गदर्शक सूचनांचा तब्बल 12 पानांचा मसुदा जाहीर केला असून, महाविद्यालयांनी संबंधित सूचना विद्यार्थ्यांना कळविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामध्ये प्रशासनाला करावी लागणारी कामे, शैक्षणिक मार्गदर्शन सूचना, चौथ्या वर्षात काय अभ्यासक्रम असणार आहे, चौथ्या वर्षाची क्रेडीट सिस्टिम कशी असेल, चौथ्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राबवायची आदींचा या मसुद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पूर्ण अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT