Navratri Temples Pudhari
पुणे

Pune Navratri Festival: पुण्यात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय जागर; देवीदर्शनासाठी मंदिरांत भाविकांची गर्दी

‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला; आज ललिता पंचमी, देवीच्या विशेष पूजेची तयारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नवरात्रोत्सवामुळे शहर आणि उपनगरांतील देवीच्या मंदिरांमध्ये भक्तीचा जागर सुरू असून, देवीदर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. देवीचा जयघोष, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि विद्युत रोषणाईने उजळलेला मंदिर परिसर, असे भक्तिमय वातावरण नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला म्हणजेच बुधवारी (दि. १४) पाहायला मिळाले.

मंदिरांमध्ये सुरू असलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवाचा उत्साह अधिकच वाढला आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्ये देवीची पूजा-अर्चा, आरती, भजन कीर्तनाचे आयोजन केले जात आहेत. गुरुवारी (दि.१५) ललिता पंचमी साजरी होत असून, त्यानिमित्ताने देवीच्या विशेष पूजेची तयारी करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी शहरातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), चतु:शृंगी देवी मंदिर (सेनापती बापट रस्ता), महालक्ष्मी मंदिर (सारसबागसमोर), भवानीमाता मंदिर (भवानी पेठ), तळजाईमाता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर), काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ) आणि वनदेवी मंदिर (कर्वेनगर) यांसह शहर आणि उपनगरांतील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

नवरात्रोत्सवामुळे मंदिर परिसरांना जत्रेचे स्वरूप

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईचा यामध्ये मोठा सहभाग दिसून आला. काही मंदिरांमध्ये प्रवचन, भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 'उदे गं अंबे उदे'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवामुळे मंदिर परिसरांना जत्रेचे स्वरूप आले आहे. मंदिरांबाहेर फुले, हार, नारळ, प्रसाद आणि पूजेचे साहित्यांच्या विक्रीसाठीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्यासोबतच खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावले आहेत. देवीदर्शनासाठी आलेले भाविक पूजेचे साहित्य खरेदी करण्यासोबतच खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषेत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमुळे मंदिर परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी ललिता पंचमी साजरी होणार असल्याने मंदिरांमध्ये देवीच्या विशेष पूजेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी भाविक उपवास, मंत्रपठण, आरती आणि पूजा करून देवीची आराधना करणार आहेत. देवीकडे आयुष्यात सुख-समृद्धी नांदावी आणि जीवनातील संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केली जाणार आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवातील प्रमुख दिवस

  • ललिता पंचमी - गुरुवार, १५ ऑक्टोबर

  • सरस्वतीपूजन - शनिवार, १७ ऑक्टोबर

  • महालक्ष्मीपूजन (घागरी फुंकणे) - रविवार, १८ ऑक्टोबर

  • दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास - सोमवार, १९ ऑक्टोबर

  • विजयादशमी (दसरा), महानवमी, नवरात्रोत्थापन - मंगळवार, २० ऑक्टोबर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT