Nashik-Pune Railway  Pudhari
पुणे

Pune Nashik Railway Route Controversy: पुणे–नाशिक रेल्वेमार्ग शिर्डीकडे वळला; आंबेगाव–जुन्नरचा विकास ठप्प होण्याची भीती

पर्यटन, उद्योग, रोजगार संधींवर गदा; स्थानिकांमध्ये संतापाची लाट

पुढारी वृत्तसेवा

मंचर: पुणे-नाशिक रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळविण्याचा निर्णय जाहीर होताच आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वेमार्ग बदलल्याने या दोन्ही तालुक्यांच्या विकासाला मोठा धक्का बसला आहे. पर्यटन आणि उद्योगक्षेत्रातून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या तीन दशकांपासून आंबेगाव-जुन्नर या भागातून रेल्वेमार्ग जाणार अशी चर्चा होती. तीन वेळा या मार्गाचे सर्वेक्षण झाले. खेड-मंचर परिसरात भूसंपादनही करण्यात आले. काही शेतकऱ्यांना तर भूसंपादनाचा मोबदलादेखील मिळाला. त्यामुळे रेल्वेमार्ग निश्चित झाल्याचा विश्वास निर्माण झाला. मात्र, आता रेल्वेमार्ग शिर्डीकडे वळवल्याने या दोन तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी खीळ बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आंबेगाव आणि जुन्नर परिसर पर्यटनदृष्ट्‌‍या अतिशय महत्त्वाचा आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकरसारखे जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक स्थळ, अष्टविनायकांतील ओझर व लेण्याद्री, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ही ऐतिहासिक स्थळे या भागात आहेत. रेल्वेमार्ग या भागातून गेल्यास उद्योगपती, पर्यटन क्षेत्र, शिक्षण संस्था, व्यापारी वर्ग आणि स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला असता. परंतु, मार्ग बदलल्याने विकासाची गाडी अडथळ्यात अडकण्याची शक्यता आहे.

रेल्वे आंबेगाव-जुन्नरमार्गे गेली असती तर व्यवसायाला नवी दिशा मिळाली असती. मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि बाहेरून ग््रााहक येण्यासाठी मोठी सोय झाली असती.
प्रवीण शिंदे, सचिव, आंबेगाव तालुका व्यापारी असोशिएशन, मंचर

या रेल्वेमुळे आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांना रोजगार, जोडधंदे, बाजारपेठ आणि सोयीसुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. रेल्वेमुळे या दोन तालुक्यांचा नकाशाच पालटेल, असा विश्वास नागरिकांना होता. आता हा प्रकल्प दूर गेल्याने “विकासाचे दार बंद झाले” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रियता आणि योग्य पातळीवर पाठपुरावा न झाल्याचीही जोरदार चर्चा आहे.

शिवनेरी, भीमाशंकर, ओझर येथे मोठ्या संख्येने भाविक तसेच पर्यटक येत असतात. रेल्वेमुळे पर्यटकांचा ओघ वाढून हॉटेल उद्योग वाढला असता. आता मार्ग बदलल्याने या उद्योगाच्या विकासाला खीळ बसली आहे.
संदेश राजाराम बागल, धनंजय फलके हॉटेल व्यावसायिक
रेल्वे आली असती तर इथल्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली असती. स्थानिक चालक, मार्गदर्शक, दुकानदार सर्वांनाच फायदा झाला असता. आता मार्ग सरळ शिर्डीकडे गेल्याने आमचे नुकसान झाले आहे.
सदानंद मोरडे, अध्यक्ष, भूमी अभिलेख संघटना, पुणे
द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला यांचा मोठा पुरवठा पुणे-नाशिकदरम्यान होतो. रेल्वेमुळे माल पोहोचवणे स्वस्त आणि जलद झाले असते
संजय पवळे, सरपंच, पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT