Law Pudhari
पुणे

Narsapur Case Trial Update: नसरापूर प्रकरणात डीएनए पुरावे ठरले निर्णायक; खटला अंतिम टप्प्यात

सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक अहवालामुळे आरोपीविरोधातील पुरावे मजबूत; विशेष न्यायालयात सुनावणी वेगाने पुढे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चिमुकलीच्या तोंडात तिचेच लेगिंग्स तब्बल २१ सेंटिमीटर आतपर्यंत कोंबण्यात आली होती. या लेगिंग्सवर रक्त, वीर्य आणि लाळ आढळली. तसेच, छातीच्या हाडाच्या नमुन्यावरून केलेल्या डीएनए चाचणीत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. आरोपीच्या नखांखाली पीडितेची त्वचा आढळली असून, पीडितेच्या हात, गाल व मानेवरील नमुन्यांमध्ये आरोपीचे डीएनए अंश सापडले आहेत. यामुळे लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्टपणे सिद्ध होत असल्याची माहिती विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी दिली.

विशेष न्यायालयात सुरू असलेला हा खटला अंतिम टप्प्यात पोहचला असून, आत्तापर्यंत ३५ साक्षीदारांची उलटतपासणी पूर्ण झाली असून, एकूण ५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे. हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मीळ' प्रकारात मोडतो, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ॲड. मिसर यांनी सांगितले. या खटल्यात पीडितेचे आई-वडील, आजी, शोध मोहिमेत सहभागी ग्रामस्थ तसेच मुलीला मृत्यूपूर्वी आरोपीसोबत पाहणाऱ्या साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे. तीन लहान मुलांची साक्ष विशेष महत्त्वाची ठरली आहे. आरोपी काही काळ त्यांच्या शाळेत मजूर म्हणून काम करीत असल्याने मुले त्याला ओळखत होती.

घटनेच्या दिवशी आरोपीने इतर मुलांना दगड मारून हुसकावून लावले आणि पीडितेला 'गायीचे वासरू दाखवतो' असे सांगून शेडमध्ये नेले. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला आहे. संशय आल्याने मुलांनी शेडच्या फटीतून पाहिले असता मुलगी आत असल्याचे दिसले. आरोपीला हे लक्षात येताच त्याने मुलांना दगड मारत शिवीगाळ केली.

त्यानंतर मुलांनी शेडच्या छतावर दगड मारून आवाज केला. हे दगड पोलिसांनी पंचनाम्यादरम्यान जप्त केले. मुलांनी न्यायालयात दिलेली साक्ष आणि कलम १६४ अंतर्गत नोंदविलेले जबाब तंतोतंत जुळल्याचेही समोर आले आहे. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालासह डीएनए अहवाल या खटल्यातील निर्णायक पुरावा ठरला आहे. घटनास्थळ परिसरातील सात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त करून त्याचे फ्रेम-टू-फ्रेम विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपी पीडितेला घेऊन गेल्याचे स्पष्ट झाल्याचे सरकारी पक्षाने सांगितले.

भट्टीवरील कामगाराला आला मुलांचा आवाज

घटनेच्या शेडपासून केवळ वीस फुटांवर असलेल्या भट्टीवर काम करणाऱ्या एका कामगाराने दुपारी ३ ते ३.१५ वाजता जेवण करीत असताना लहान मुलांच्या ओरडण्याचा आणि शेडवर दगड पडल्याचा आवाज ऐकला होता. या स्वतंत्र पुराव्यामुळे लहान मुलांनी दिलेल्या साक्षीला पूर्णपणे दुजोरा मिळाला आहे. पुढील आठवड्यात साक्षीदारांची साक्ष पूर्ण करून न्यायालयीन सुनावणी अंतिम टप्प्याकडे येईल आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, असा विश्वास ॲड. मिसर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT