Biodiversity Garden Pudhari
पुणे

Pune Biodiversity Garden: पुण्यातील ओसाड टेकडी बनली जैवविविधतेचे नंदनवन; २३ हजार वृक्षांचे संवर्धन

नऱ्हे परिसरात १८३ देशी वनस्पती, ७२ प्रकारचे पक्षी आणि ३४ प्रजातींची फुलपाखरे; बटरफ्लाय गार्डनचीही निर्मिती

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: काही वर्षांपूर्वी मॉर्निंग वॉकर्सच्या मनात रुजलेल्या एका छोट्याशा विचारातून पुणे-नऱ्हे परिसरातील एक ओसाड टेकडी आज समृद्ध जैवविविधतेचे नंदनवन बनली आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा फाउंडेशन’च्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या लोकचळवळीमुळे या टेकडीला हिरवेगार रूप मिळाले आहे.

वर्ष २०१७ मध्ये सुरू झालेल्या या प्रवासात आतापर्यंत २३ हजारांहून अधिक वृक्षांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले आहे. केवळ झाडे लावण्यावरच नव्हे, तर ती जगवण्यावर फाउंडेशनचा विशेष भर राहिला आहे. उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा, भूमिगत पाइपलाइन, पाण्याच्या २३ टाक्या आणि सेंद्रिय खतांच्या जोरावर हजारो रोपे जोपासली गेली आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज या परिसरात १८३ हून अधिक देशी वनस्पती प्रजाती, ७२ प्रकारच्या पक्ष्यांसह तब्बल ३४ प्रकारच्या फुलपाखरांचे विलोभनीय दर्शन पुणेकरांना होत आहे.

निसर्ग अभ्यासक सुहास कडू यांच्या मार्गदर्शनात आणि कमिन्स इंडिया लिमिटेडच्या आर्थिक सहकार्याने या परिसरात एका आकर्षक ‘बटरफ्लाय गार्डन’ची स्थापना करण्यात आली आहे. फुलपाखरे, मधमाश्या आणि इतर परागीभवन करणाऱ्या जिवांसाठी एक अनुकूल अधिवास तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

आता या टेकडीला अधिक समृद्ध जंगल बनवण्यासाठी सीसीटी प्रकल्प, मृदसंधारण, शेततळ्यांची दुरुस्ती आणि ‘ओपन नेचर क्लासरूम’ विकसित करण्याचे नियोजन फाउंडेशनतर्फे करण्यात आले. या संपूर्ण विकासकामांसाठी ७० ते ८० लाखांच्या निधीची आवश्यकता असून, नागरिकांनी आणि विविध कंपन्यांनी सामाजिक दायित्व व लोकसहभागातून पुढे येऊन या निसर्गयज्ञात हातभार लावावा, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण भोसले यांनी केले आहे.

या उद्यानात आतापर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती आणि फुलपाखरांसाठी पोषक अधिवास विकसित करण्याच्या दृष्टीने कामे झाली आहेत. या उद्यानात राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मन’ याचेही दर्शन झाले आहे. फाऊंडेशनचे सदस्य स्वतः श्रमदान करून, कष्टांची पराकाष्ठा करत, वेगवेगळ्या वनस्पती अभ्यासकांचे मार्गदर्शन घेत आहेत.
प्रवीण भोसले, अध्यक्ष, झाडे लावा, झाडे जगवा फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT