विनय पुराणिक
पुणे: शहरात प्रवेश करण्यापूर्वीच वाहतूक कोंडीचा सामना, अरुंद रस्त्यांमधून वाट काढताना अपघातांचा धोका आणि वाहनांच्या धुरातून वाढणारे प्रदूषण... ही पुण्याच्या ईशान्य दिशेचे प्रवेशद्वार असलेल्या नगर रस्त्याची रोजचीच कहाणी झाली आहे. रस्त्यावरील अतिक्रमणांनी आधीच मर्यादित असलेली वाहतूक व्यवस्था अधिकच संकुचित केली आहे. त्यात वाहतूक कोंडी, अपघात आणि रखडलेल्या विकासप्रकल्पांची भर पडली आहे. कागदोपत्री नियोजन आणि प्रत्यक्षातील रखडपट्टी यामधील दरीमुळे या मार्गावरील नागरिकांचे दैनंदिन जगणे जिकिरीचे झाले आहे. शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी नगर रस्ता हे प्रवेशद्वार कमी आणि मनस्तापाचा मार्ग अधिक ठरत आहे.
अर्धवट उखडलेले तर काही ठिकाणी नाहीसे झालेले पदपथ, खड्डेमय रस्ते, रस्त्यावर पदपथारी- खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण, रस्त्यांच्या दुतर्फा अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने, दुरुस्तीकामांचा पडलेला राडारोडा, मेट्रोचे अर्धवट बांधकाम, खासगी आणि प्रवासी बसथांब्यांचा ताळमेळ नसल्याने पीएमपीच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी, उलट्या दिशेने ये- जा करणारे बेशिस्त वाहनचालक आणि या सर्वातच सरकारकडून केवळ कागदावर राहिलेल्या विकास प्रकल्प, अशा परिस्थितीत दररोज सुमारे दीड लाख वाहनांची वर्दळ येरवडा परिसरात सुरू असून, स्थानिकांना व पुणेकरांना अडथळ्यांची शर्यत पार करून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
येरवडा ते खराडी बायपास येथपर्यंत दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीतून येरवडा परिसराचा श्वास कोंडल्यासारखी स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पुणे शहरातील पूर्व आणि पश्चिम भाग, तसेच दक्षिणेकडे ये-जा करणारी वाहतूक प्रामुख्याने विमाननगरमधील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकण- रांजणगाव- शिरूरमधील औद्योगिक वसाहती, खराडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्या, मोठमोठी पंचतारांकित हॉटेल्स, आलिशान गाड्यांची दालने, मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये, शासकीय कार्यालये आणि वसाहती असल्याने या ठिकाणी जड-अवजड वाहनांपासून इतर वाहनांचा रात्रंदिवस राबता सुरू असतो. तसेच, येरवडा, चंदननगर, शास्त्रीनगर, टिंगरेनगरच्या लगतचा परिसर दाट लोकवस्तीचा असून, स्थलांतरितांचे आलेले लोंढे यामुळे वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे येथील रस्ते देखील अपुरे पडत असून, याचा ताण आपोआपच इतर यंत्रणेवर पडत आहे.
विशेषतः येरवड्यातील शास्त्री चौक हा वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू झाला आहे. या चौकातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींची ये-जा सुरू असते. त्यांचा ताफा आल्यावर वाहतूक थांबवण्यात येते. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर तासन्तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
पदपथांवर अतिक्रमणे; प्रवासी रस्त्यांवर
या रस्त्यावर बीआरटी मार्ग होता. आता तो काढून टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीच्या कामांमुळे रस्त्यालगत लोखंडी अडथळे उभे करण्यात आले असून, ‘पीएमपी’चे थांबे मागे गेल्याने प्रवाशांना रस्त्यावर येऊन बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
नागरिक काय म्हणतात?
वाहतूक पोलिसांनी नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडीपर्यंत सर्व रस्ते बंद करून दूरवर ‘यू- टर्न’ तयार केले आहेत. मात्र, हे करताना शास्त्रीनगर, रामवाडी, भाभानगर, श्रीराम सोसायटी, नागपूरचाळ किंवा इतर परिसरातील स्थानिकांना विचारात घेतलेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी शास्त्री चौकात खासगी बस आणि वाहनांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे, असे या परिसरातील नागरिक प्रमोद देवकर म्हणाले.
रस्त्यालगत बस
पुण्यातून नगर रस्त्याने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या खासगी प्रवासी बस या मार्गाचा वापर करतात. बंडगार्डन, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघोली ते बायपासपर्यंत खासगी प्रवासी बसची कार्यालये आणि थांबे आहेत. रस्त्याच्या दुतर्फा या बस उभ्या असतात. प्रवाशांना सोडण्यासाठी आलेली वाहनेही थांबत असल्याने येथील वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे.
शास्त्री चौकात सतत कोंडी
पूर्व- पश्चिम भाग जोडणाऱ्या येरवड्यातील शास्त्री चौक मुख्य आहे. या चौकातच येरवडा पोलिस आणि विमानतळ वाहतूक पोलिस ठाणी आहेत. कल्याणीनगर, विमानतळ, नागपूरचाळ, गोल्फ कोर्स आणि गुंजन चित्रपटगृह या परिसरातील रस्ते याच चौकात एकत्र येतात. सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण दिवे असतानाही वाहनचालकांकडून या चौकात उलट्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांचे प्रमाण जास्त आहे.