पुणे

पुणे पालिकेची ‘शहरी गरीब’ विमा कंपनीकडे जाणार नाही

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची शहरी गरीब योजना विमा कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. त्यावर टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका प्रशासनाने यू-टर्न घेतला आहे. शहरी गरीब योजना कोणत्याही परिस्थितीत विमा कंपनीकडे दिली जाणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले. तसेच, शहरी गरीब विमा कंपनीकडे देण्यासंदर्भात कधीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजी माजी सभासद व त्यांचे कुटुंबीय आणि अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अंशदायी वैद्यकीय योजना (सीएचएस) राबविली जाते. ही योजना विमा कंपनीमार्फत राबविण्यात येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. यानंतर शहरी गरीब योजनाही विमा कंपनीच्या ताब्यात देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या.

याबाबत आरोग्य प्रमुखांना एका विमा कंपनीने पत्र देऊन शहरी गरिब योजनेची माहिती मागितली. हे पत्र हाती लागल्यानंतर 18 जून रोजी दैनिक 'पुढारी'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या टीकेनंतर महापालिका प्रशासनाने शहरी गरीब योजना कोणत्याही परिस्थितीत विमा कंपनीच्या ताब्यात दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT