School Pudhari
पुणे

Pune Municipal Schools: पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये 10 ई-लर्निंग आणि 8 नवीन सीबीएसई शाळा सुरू

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी 144 शाळा आदर्श शाळांमध्ये विकसित; डेटा एंट्री ऑपरेटर आणि स्वच्छता कर्मचारीही नियुक्त

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या शाळांमधील शिक्षण अधिक दर्जेदार आणि स्पर्धात्मक करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका 10 ई-लर्निंग शाळा सुरू करणार असून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमावर आधारित 8 नवीन शाळाही सुरू करण्यात येणार आहेत. महापालिका शिक्षणव्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दिली. यासोबतच शाळांसाठी नवीन इमारती उभारणे आणि जुन्या इमारतींची देखभाल-दुरुस्तीकडेही प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

महापालिकेच्या शाळांची सध्याची दुरवस्था आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याची गरज लक्षात घेऊन यंदा या क्षेत्रावर अधिक भर देण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात शाळांच्या नवीन इमारती बांधण्यासाठी तसेच जुन्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे 68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका शिक्षणव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी लर्निंग शाळा आणि सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या राजीव गांधी लर्निंग शाळेसह काही शाळांना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आणखी 10 लर्निंग शाळा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरात सीबीएसई अभ्यासक्रमाच्या 8 नवीन शाळा सुरू करण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे. याशिवाय शहरातील महापालिकेच्या 75 शैक्षणिक संकुलांमधील एकूण 144 शाळा ‌‘आदर्श शाळा‌’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच चांगल्या सोयी-सुविधा आणि अत्याधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि नियमित साफसफाई यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

300 डेटा एंट्री ऑपरेटर, 300 स्वच्छता कर्मचारीही नियुक्त करणार

प्रशासकीय कामकाजामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मोठा वेळ खर्ची पडत असल्याने अध्यापनावर परिणाम होत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक शाळेत एक याप्रमाणे सुमारे 300 डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या स्वच्छ ठेवण्यासाठी 300 स्वच्छता कर्मचारीही नियुक्त केले जाणार आहेत. या कामासाठी सुमारे 7 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच वर्कऑर्डर देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शाळांच्या विकासावरही भर दिला जाणार आहे. लर्निंग शाळा तसेच सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. जुन्या शाळांची देखभाल दुरुस्ती करण्यासह नवीन शाळांची उभारणी केली जाणार आहे. शाळांमधील स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा भार कमी करण्यासाठी डेटा एंट्री ऑपरेटरचीही नियुक्ती केली जाणार आहे.
पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT