Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या झाडणकामावर राजकीय दबाव? ठेकेदारांना नगरसेवकांच्या माणसांचा आग्रह

नव्या स्वच्छता व्यवस्थेत ९ हजार ५२३ कर्मचारी रस्त्यावर; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेण्यास ठेकेदारांचा विरोध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या रस्ते झाडणकामाच्या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू होत असतानाच काही नगरसेवकांकडून झाडणकामांसाठी आपलीच माणसे घ्यावीत, यासाठी ठेकेदारांवर दबाव आणला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, नगरसेवकांची माणसे काम करत नसल्याने ठेकेदारांनी त्यास विरोध दर्शवला आहे.

ठेकेदारांकडून रस्त्यांवर प्रत्यक्ष झाडणकाम न करता केवळ कागदोपत्री काम झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झाडणकामाच्या पद्धतीत बदल केला आहे. आता केवळ कामगार पुरविण्याची जबाबदारी ठेकेदारांची राहणार नसून, त्यांना नेमून दिलेल्या परिसरातील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद केली आहे.

या नव्या व्यवस्थेसाठी महापालिकेने झाडणकामाचे मनुष्यबळ जवळपास दुप्पट केले आहे. यापूर्वी ४ हजार ८१६ कर्मचारी या कामासाठी कार्यरत होते. आता त्यात आणखी ४ हजार ७०९ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ९ हजार ५२३ कर्मचारी शहरातील रस्त्यांवर झाडणकाम करणार आहेत. वाढीव मनुष्यबळामुळे शहरातील स्वच्छतेत सुधारणा होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

या नवीन धोरणाला सत्ताधारी भाजप नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान, झाडणकामासाठी वाढीव मनुष्यबळाची भरती सुरू असतानाच त्यासाठी आपलीच माणसे घ्यावीत, यासाठी काही नगरसेवकांनी थेट ठेकेदारांच्या मागे तगादा लावला आहे. त्यासाठी काही जणांनी थेट ३० ते ४० लोकांची यादीच त्यांच्याकडे सोपवली आहे, तर काहींनी आपल्या वैयक्तिक कामांसाठी दोन-तीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या वशिल्याने भरती झालेले कर्मचारी काम नाहीत, आणि आता स्वच्छतेची थेट जबाबदारी ठेकेदारांवरच असल्याने ठेकेदारही नगरसेवकांची माणसे नको रे बाबा अशा भूमिकेत आहेत.

महापौरांनी घेतली बैठक

महापौर मंजूषा नागपुरे यांनी शुक्रवारी याबाबत बैठक घेतली. सभागृहनेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्यासह नगरसेवक आणि संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नवीन झाडणकामांबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT