पुणे : महापालिकेची आरक्षण सोडत पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पूर्वनियोजनानुसार ही सोडत 10 ते 15 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणताही अधिकृत आदेश आलेला नसल्याने आरक्षण सोडतीला दिवाळीनंतरचा मुहूर्त लागणार, असे चित्र आहे, त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढू लागली आहे.(Latest Pune News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष प्रभागनिहाय आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. प्रारूप प्रभागरचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने त्यांचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले आहेत.
तसेच, काही प्रभागांची नावेही बदलण्यात आली आहेत. त्यामुळे काही इच्छुकांना दिलासा मिळाला, तर काही हरकतदारांचे समाधान झाले आहे. दरम्यान, शहरातील इच्छुक उमेदवारांनी निवडणूक तयारीला जोर लावला आहे. प्रभागांमध्ये फ्लेक्सबाजी, जनसंपर्क, विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले असून, अनेकांनी आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रचार मोहीम अधिक वेग घेईल, असा उमेदवारांचा अंदाज आहे.
मात्र, अद्याप आरक्षण सोडत जाहीर झाली नसल्याने कोणत्या प्रभागात कसे आरक्षण पडणार, हे अद्याप गुलदस्तात आहे. निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यावर 10 ते 15 ऑक्टोबरदरम्यान आरक्षण सोडत जाहीर होणार होती. मात्र, अद्याप ही आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतरच आरक्षण सोडत होईल, अशी चर्चा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात आहे.