Parking Pudhari
पुणे

Pune Municipal Parking Arrears: पुणे महापालिकेच्या वाहनतळांची ८६ लाखांची थकबाकी; १२ ठेकेदारांकडून भाडे थकीत

३१ पैकी २७ वाहनतळ सुरू; महसूल वसुलीला फटका, थकबाकीदार ठेकेदारांवर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या ताब्यातील सार्वजनिक वाहनतळांमधून महसूल मिळत असला, तरी अनेक ठेकेदारांकडून भाडेवसुली रखडल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या ३१ वाहनतळांपैकी सध्या २७ वाहनतळ कार्यरत असून, त्यापैकी १२ वाहनतळांचे एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे भाडे थकीत आहे. जून २०२६ अखेर या वाहनतळांकडील एकूण थकबाकी ८६ लाख ७० हजार ६९९ रुपये इतकी झाली आहे.

नगरसेवक देवेंद्र वडके यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही माहिती समोर आली. महापालिकेच्या मालमत्ता व प्रकल्प विभागाकडून सार्वजनिक वाहनतळांचे संचालन प्रचलित पार्किंग धोरणानुसार केले जाते. उपलब्ध आकडेवारीनुसार ३१ वाहनतळांपैकी २७ सुरू असून, चार वाहनतळ विविध कारणांमुळे बंद आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनतळाचे आगाऊ भाडे जमा करण्यात आले आहे, तर तीन वाहनतळांवर कोणतीही थकबाकी नाही. सहा वाहनतळांचे चालू महिन्याचे भाडे थकीत असून, ते नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी संबंधित ठेकेदारांकडून वसूल केले जाणार आहे.

मात्र, १२ वाहनतळांचे एक महिन्याहून अधिक कालावधीचे भाडे अद्यापही बाकी असल्याने महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत आहे. महापालिकेकडून सार्वजनिक वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया राबवून सर्वाधिक वार्षिक मक्ता देणाऱ्या निविदाधारकास वाहनतळ चालविण्याचा अधिकार दिला जातो. त्यानंतर पार्किंग धोरणानुसार करार केला जात असून, करारातील अटींची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची

प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी पाहणी केली जाते. दरम्यान, मासिक भाडे मुदतीत न भरल्यास संबंधित ठेकेदाराला प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला जातो. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास करारातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई केली जाते. त्यानंतरही थकबाकी न भरल्यास संबंधित ठेकेदाराच्या मिळकतीवर बोजा चढविण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT