

पुणे: रस्त्यावर दमदाटी झाल्यानंतर न्याय मिळावा म्हणून एक डिलिव्हरी बॉय पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. मात्र, त्याची तक्रार नोंदवण्याऐवजी पोलिस हवालदाराने ‘सावधपणे गाडी चालवा’ असा सल्ला देत त्याला परत पाठवले. हा तक्रारदार प्रत्यक्षात पोलिसांनीच पाठवलेला डमी डिकॉय असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित हवालदारावर कारवाई करत त्यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली.
राजेश किसन सांळुके असे त्या हवालदाराचे नाव आहे. साळुंके यांची यापूर्वी मुंढवा पोलिस ठाण्यात नियुक्ती होती. सध्या ते विमानतळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिस ठाण्यात येणार्या सर्वसामान्यांना खरोखरच सन्मानाची वागणूक मिळते की त्यांना चकरा माराव्या लागतात? हे तपासण्यासाठी २१ जून २०२६ रोजी शुभम नावाच्या एका तरुणाला 'डमी तक्रारदार' बनवून मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाठवले.
शुभमने डिलिव्हरी बॉयचा वेश घातला होता. रस्त्यात रॅश ड्रायव्हिंग करणार्या एका चालकाने आपल्याला अडवून शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार घेऊन तो आधी मुंढवा पोलिस चौकीत गेला. मात्र, तिथल्या पोलिसांनी नेहमीप्रमाणे 'मुख्य पोलिस ठाण्यात जा' सांगून हात झटकले. मुख्य मुंढवा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर शुभम हवालदार राजेश सांळुके यांना भेटला.
एका सामान्य डिलिव्हरी बॉयने मांडलेली आपबीती ऐकल्यानंतर, गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी हवालदाराने घटना घडली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. बरं, तुम्हाला कुठे मार लागलाय का? म्हणत डिलिव्हरी बॉयचे काम करताना स्वतःच काळजीपूर्वक वाहन चालवत जा,' असा सल्ला देत परत पाठवले.
हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकार्यांच्या रडारवर होता. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. साळुंकेंनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावर २ वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्याचा आदेश परिमंडळ ६चे पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी दिला.