

पुणे: कात्रज येथील भारती हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीलगत असलेली दगडी सीमाभिंत शनिवारी सकाळी अचानक कोसळली. भिंतीच्या शेजारी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पार्क केलेल्या ५० दुचाकींवर भिंतीचा भाग कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मलबा हटवून दुचाकी बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.
भारती हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीशेजारी ही जुनी दगडी सीमाभिंत होती. ही भिंत सुमारे २० फूट उंच, तर तब्बल १०० फूट लांब होती. विशेष म्हणजे या भिंतीवर मोठमोठी झाडे वाढलेली होती. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक सीमाभिंत कोसळली.
भिंतीलगत हॉस्पिटलमधील कर्मचारी आपल्या दुचाकी पार्क करतात. या दुचाकी भिंतीखाली गाडल्या गेल्या. दगड, माती आणि झाडांचा मोठा भाग दुचाकींवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळ दाटीवाटीचे असल्याने राडारोडा काढताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागली.
केवळ एका जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटविण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दुचाकी बाहेर काढण्याच्या काम संथगतीने सुरू होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५ ते २७ दुचाकी मलब्यातून बाहेर काढल्या होत्या. मोठ्या प्रमाणात राडारोडा शिल्लक असल्याने इतर दुचाकी बाहेर काढण्याचे काम सुरूच होते. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवानांचे काम सुरू होते.