बालरुग्णांना ससूनवर अवलंबून का? महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर नाहीत! Pudhari
पुणे

Pune municipal hospitals pediatric ICU crisis: बालरुग्णांना ससूनवर अवलंबून का? महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर नाहीत!

कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयात ICU यंत्रणा असूनही बालरोग विभाग ठप्प; ससूनकडून प्रशासनाला पत्र

पुढारी वृत्तसेवा

पुणे : कमला नेहरू रुग्णालयामध्ये बालरोग अतिदक्षता विभागाची सोय नाही... राजीव गांधी रुग्णालयात आयसीयूसाठी लागणारी यंत्रसामग्री असूनही विभाग कार्यरत नाही... असे चित्र महापालिका रुग्णालयांमध्ये पाहायला मिळत आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्याने बालरुग्ण ससून रुग्णालयात पाठवले जात आहेत. त्यामुळे ससूनवर ताण येत असल्याने ससूनच्या बालरोग विभागाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.(Latest Pune News)

सध्या महापालिकेकडे एकूण 145 मंजूर पदांपैकी फक्त 39 डॉक्टर करारावर कार्यरत असून 106 पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी 50 डॉक्टर, 50 सहाय्यक परिचारिका आणि 15 फार्मासिस्ट नेमण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्यात आला होता. मात्र, अजूनही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांनी कमला नेहरू रुग्णालय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहून बालरोग अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे आणि बालरुग्णांवर शक्य तेवढे उपचार करण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले आहे.

ससून रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आले असून, 2025 च्या जानेवारीपासून महापालिकेने एकही डॉक्टर करारावर नेमलेला नाही, अशी माहितीही समोर आली आहे. 2021 मध्ये महापालिकेने येरवड्यात राजीव गांधी रुग्णालयात अत्याधुनिक बालरुग्णालय उभारले असले तरी मनुष्यबळाच्या अभावामुळे ते अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे ससून रुग्णालयावर ताण वाढला आहे.

पत्रात काय नमूद?

कमला नेहरू रुग्णालयातील अतिदक्षता विभाग राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उन्नत करणे आवश्यक आहे. अनेकदा बालरुग्ण रात्री उशिरा ससूनकडे पाठवले जातात आणि ट्रान्सफर प्रोटोकॉल पाळला जात नाही. काही रुग्ण कमला नेहरू रुग्णालयातच व्यवस्थित हाताळता येऊ शकतात; तरीही ते थेट आमच्याकडे पाठवले जातात. आमच्याकडून कोणत्याही रुग्णाला नकार दिला जात नाही, पण अनेकदा व्हेंटिलेटरची कमतरता भासते. कमला नेहरू रुग्णालयाला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय जोडले गेले आहे. त्यामुळे तिथे पूर्ण क्षमतेचा बालरोग विभाग आणि अतिदक्षता विभाग उभारणे गरजेचे आहे.

आमच्याकडे यंत्रसामग्रीचा तुटवडा नाही. पण डॉक्टरांच्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. विभाग 24 तास कार्यरत ठेवण्यासाठी किमान नऊ बालरोगतज्ज्ञांची आवश्यकता आहे. जानेवारी 2024 मध्ये करारावर डॉक्टर नेमण्याचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यावर अजून निर्णय झालेला नाही. आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर आणि उपकरणे विकत घेऊ शकतो, पण प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणे कठीण झाले आहे.
डॉ. कल्पना बळीवंत, उप आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT