

पुणे : शहरात रात्रीच्या वेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या एकट्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील आरोपी चोरी केलेले मोबाईल हँडसेट जाहिरातीद्वारे ओएलएक्सवर विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती तपासामध्ये उघड झाली आहे.(Latest Pune News)
याप्रकरणी फैजान मोहम्मद गौस शेख (रा. जामा मज्जीदजवळ, आदर्शनगर, उरुळी देवाची) याला अटक करण्यात आली. तसेच, त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून तब्बल तीन लाख 70 हजारांचे 30 मोबाईल हँडसेट आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. वानवडी पोलिस ठाण्याकडील तपास पथकाचे पोलिस अंमलदार अतुल गायकवाड आणि अमोल पिलाणे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, नवीन म्हाडा कॉलनीजवळ कच्च्या रस्त्यावर एका रिक्षात बसलेल्या तीन व्यक्ती चोरीचा एक मोबाईल हँडसेट बिहारी कामगारांना विकण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते रिक्षा चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी लागलीच त्यांना पकडले. त्यांच्याकडे तपासणी केली असता, त्यांच्याकडे एक मोबाईल आणि रिक्षाच्या डिक्कीत एक चाकू सापडला. त्यानंतर त्यांनी चोरी केलेले 30 मोबाईल काढून दिले. या कारवाईमुळे वानवडी पोलिस ठाण्यातील तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. हे मोबाईल चोरीनंतर ते मोबाईल ओएलएक्सद्वारे विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, महिला पोलिस अंमलदार सुजाता फुलसुंदर यांच्या पथकाने केली.
निर्जनस्थळी चाकूच्या धाकाने लुटायचे
आरोपी शिवाजीनगर येथे जाणाऱ्या एकट्या प्रवाशाला 50 रुपयांत सोडतो, असे सांगून रिक्षामध्ये बसवत असत. त्यानंतर त्यांना टर्फ क्लब रेसकोर्स, भैरोबानाला यांसारख्या निर्जन स्थळी घेऊन जाऊन, चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हँडसेट, रोख रक्कम व इतर वस्तू लुटत होते.