

खडकवासला : सिंहगड, पानशेतसह आंबी कादवे, रुळे, कुरण, अतकरवाडी, डोणजे परिसरात बिबट्यांचा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे गुराख्यांसह स्थानिक नागरिकांत दहशत पसरली आहे. (Latest Pune News)
आंबी (ता. हवेली) येथे मधुकर पाटील यांच्या जनावरांवर बिबट्याने नुकताच हल्ला केला. त्यावेळी बिबट्याने म्हशीच्या पारडाकडे धाव घेऊन त्याला चावा घेतला. त्यावेळी कळपातील एक म्हैस बिबट्याच्या अंगावर धावून गेली. म्हशीने पारडाचे जीव वाचवण्यासाठी जोरा जोरात हंबरडा फोडला. त्यावेळी बिथरलेला बिबट्या म्हैशीच्या अंगावर धावून गेला. अखेर म्हशीचे आक्रमक रुप पाहून बिबट्या जंगलात पसार झाला.
स्थानिक शेतकरी नाना निवंगुणे म्हणाले की, आंबीच्या जंगलात 4 ते 5 बिबट्यांचे वास्तव्य आहे. सभोवती असलेल्या घनदाट जंगलात पाणवठे आणि खाद्य मुबलक प्रमाणात आहेत वन्यजीवांचा अधिवास वाढला आहे. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, सिंहगड पश्चिम हवेली भागातील जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन केले आहे.