

पुणे : न्यायालयातून शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर शिवाजीनगर पोलिसांनी नाट्यमय कारवाईत जेरबंद केले. अनमोल अतुल जाधवराव (वय 36, रा. सूरजनगर, महाराजा कॉम्प्लेक्सजवळ, कोथरूड डेपो) असे अटक केलेल्याचे नाव आहे. 2012 मधील खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यावर तो न्यायालयातून फरार झाला होता. (Latest Pune News)
त्याला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्ट, विनयभंग असे पाच गुन्हे दाखल आहेत. न्यायालयीन सुनावणीदरम्यान त्याने पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. तेव्हापासून तो राज्यभर ठिकठिकाणी वेशांतर करून फिरत होता. क्राइम पेट्रोल मालिका पाहून तो पोलिसांना चकवा देत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिस नाईक सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, फरार अनमोल हा अहिल्यानगरहून वाघोलीच्या दिशेने कारने येत आहे. त्यानंतर तत्काळ खांदवेनगर परिसरात सापळा लावण्यात आला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका हॉटेलसमोर संशयित कार थांबताच पोलिसांनी चारही बाजूंनी घेराव घातला. अनमोलला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या आणखी एकाची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सर्व माहिती कबूल केली. त्यावेळी अनमोलने आपल्या पलायनानंतरच्या हालचालींचा खुलासा केला.
चौकशीत उघड झाले की, अनमोलने ’क्राइम पेट्रोल’, ’सावधान इंडिया’, ’सीआयडी’ या मालिकांमधून पोलिसांच्या तपास पद्धतीचा सखोल अभ्यास केला होता. त्यावरून प्रेरणा घेऊन त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचे कौशल्य आत्मसात केले होते. तो नाशिक, मुंबई, सांगली, सातारा तसेच पुण्यातील पौड, मुळशी, हवेली परिसरात वेशांतर करून वावरत होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार ठिकाण बदलत असे. प्रवासादरम्यान लोकांना आपला मोबाईल हरवला आहे, असे सांगून तो त्यांच्या फोनवरून मित्रांशी संपर्क साधत असे आणि लगेच ठिकाण बदलत असे. त्याची ही युक्ती तपासात उघड झाली. या कारवाईदरम्यान त्याच्यासोबत असलेला एक साथीदार अक्षय संजय हंपे (वय 30, सौरभनगर, भिंगार, अहिल्यानगर) हा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचेही समोर आले. त्याला पुढील चौकशीसाठी भिंगार पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक गुन्हे धनंजय पिंगळे, उपनिरीक्षक अजित बडे, प्रमोद पाटील, पोलिस हवालदार दीपक चव्हाण, पोलिस हवालदार राजकिरण पवार, पोलिस नाईक सचिन जाधव, पोलिस नाईक दीपक रोमाडे, अंमलदार सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे, इसाक पठाण, तेजस चोपडे, दिनेश भोसले यांनी केली.