पुणे: पुणे महानगरपालिकेचे एकूण 53 बाह्यरुग्ण विभाग, 20 प्रसूतिगृहे, चारशे खाटांचे एक सांसर्गिक आजारांचे रुग्णालय आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी 12 हजार रुग्ण उपचार घेतात. महापालिकेच्या अंदाजपत्रकात वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये कमला नेहरू आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयातील आरोग्य सेवांचे विस्तारीकरण व अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
अकरा मल्टी स्पेशालिटी रुग्णालये:
शहरातील सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टिस्पेशालिटी रुग्णालये म्हणून विकसित केली जाणार आहेत.
आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
वारजे येथे 10 हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर 350 खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
गंगाधाम परिसरात एमआरआय व सिटी-स्कॅन केंद्र उभारण्यात येणार असून, त्यामुळे महागड्या निदान चाचण्या कमी दरात उपलब्ध होतील.
प्रसूतिगृहांमध्ये ‘आयव्हीएफ’ उपचार सेवा
महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ उपचार सेवा सुरू करण्यात येणार असून वंध्यत्वावरील आधुनिक उपचार गरजू कुटुंबांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
कर्करोग, डायलिसिस उपचारांसाठी आर्थिक साह्य मर्यादेत वाढ
कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठी डायलिसिस उपचारांवरील आर्थिक सहाय्य मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची फेररचना करून ती अधिक सक्षमपणे राबविण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडणार असून पदव्युत्तर शिक्षण, जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सुविधा आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालय परिसरात विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी निवासासाठी 14 मजली इमारत उभारण्यात येणार आहे.