Shiv Sena  Pudhari
पुणे

Pune Municipal Election Shiv Sena: पुणे महापालिका निवडणूक; शिवसेना स्वबळावर; एबी फॉर्म वादाने खळबळ

भाजपसोबत युती न झाल्याने शिंदे गटाचे 110 उमेदवार रिंगणात; उमेदवारी अर्जावरून वाद चव्हाट्यावर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर युती झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून, शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 110 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेने पुणे महापालिकेसाठी 123 उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. त्यापैकी विविध कारणांमुळे 12 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात शिवसेनेचे 110 उमेदवार उरले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत युतीबाबत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, ही पक्षाची पहिल्या दिवसापासून इच्छा होती. परंतु, जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत सुटू शकला नाही. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

पुणे शहरासाठीचा शिवसेनेचा ‌’वचननामा‌’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या वचननाम्यात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट भूमिका आणि पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा मांडण्यात येणार असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. शिवसेनेच्या प्रचाराची सुरुवात शनिवार, 3 जानेवारीला दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत करणार आहेत. त्यानंतर शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात होईल, असेही त्यांनी नमूद केले. युती का झाली नाही, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जे घडले त्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे कसे जायचे, याचा विचार करणारे आम्ही शिवसैनिक आहोत. भूतकाळात काय घडले, यावर भाष्य करण्यापेक्षा नगर विकास विभागाच्या माध्यमातून पुणे शहरात केलेली विकासकामे पुणेकरांसमोर मांडण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 9 तारखेला पुण्यात प्रचारसभा

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 9 तारखेला पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील विविध आमदारही प्रचारासाठी पुण्यात येणार असल्याचे देखील नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे (शिंदे गट) प्रभाग क्रमांक 35 मधील उमेदवार उद्धव कांबळे यांनी आपल्याच पक्षातील उमेदवाराचा एबी फॉर्म गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करीत अर्ज मागे घेण्यास सांगितले. पक्षाचा आदेश आल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका खासगी वाहिनीला दिली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

याबाबत बोलताना उद्धव कांबळे म्हणाले, “पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. एकनाथ शिंदे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर आम्ही कोणीही जात नाही. त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे. यामुळे मी आज अर्ज मागे घेतला आहे. “एकनाथ शिंदे यांनी मला आश्वासन दिलंय की माझा भविष्यात विचार केला जाईल. तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असंही ते म्हणाले.”

नेमकं प्रकरण काय?

महापालिकेच्या सहकारनगर-पद्मावती या प्रभाग क्रमांक 36 साठी शिवसेनेकडून पहिल्यांदा मच्छिंद्र ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेकडून त्यांना ‌’एबी‌’ अर्जही देण्यात आला. मात्र, त्यानंतर शिवसेनेकडून उद्धव कांबळे यांना ‌’एबी‌’ अर्ज देण्यात आला आणि तेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, ढवळे यांची उमेदवारी कायम राहिल्याने छाननीच्या वेळी कांबळे यांनी ढवळे यांना दिलेला ‌’एबी‌’ अर्ज खाऊन गिळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सहायक निवडणूक अधिकारी मनीषा भुतकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT