पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर कोणत्याही वाटाघाटी होणार नसल्याचे प्राथमिक सूत्र गुरुवारी भाजप व शिवसेनेच्या झालेल्या बैठकीत ठरले आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या १२५ जागा वगळता उर्वरित म्हणजेच विरोधकांकडील जागांवरच युतीअंतर्गत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या शिवसेनेकडे केवळ एक नगरसेवक असून, महायुतीतील वाटाघाटीत त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर पुण्यातील एका हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते, तर शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे, शहरप्रमुख नाना भानगिरे सहभागी झाले होते.
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पुणे महापालिकेत किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडे सध्या १०५ माजी नगरसेवकांचे संख्याबळ आहे. गेल्या वेळी दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांना भाजप संधी देणार आहे. त्यामुळे भाजप १२५ जागा निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. १२५ व्यतिरिक्त जागांवरच महायुतीच्या वाटाघाटी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. भाजपने मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने जिंकलेल्या सुमारे ५० जागांवर लक्ष केंद्रित केले असून, त्या ठिकाणी सक्षम उमेदवार उभे करण्यासाठी अन्य पक्षांतील काही प्रमुख नेत्यांचे पक्षप्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे. पुढील बैठकीतही विरोधकांच्या जागांवरच चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) सध्या एका नगरसेवकावर असल्यामुळे त्यांना भाजप किती जागा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महापालिका निवडणुका भाजप-शिवसेना युतीतूनच लढवल्या जाणार आहेत. त्या आदेशानुसार पुण्यातील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित तयारी करत आहेत. आजची बैठक ही प्राथमिक स्वरूपाची होती. या बैठकीत प्रभागरचना, संभाव्य उमेदवार, आकडेवारी तसेच दोन्ही पक्षांकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा झाली. आणखी एक-दोन बैठका झाल्यानंतरच अंतिम जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. काही नावे आणि प्रभागांवर चर्चा झाली. एक-दोन बैठका झाल्यानंतर जागावाटपावर एकमत होईल. त्यानंतरच युतीची औपचारिक घोषणा करण्यात येईल.मुरलीधर मोहोळ, खासदार, पुणे
शिवसेना भाजप युती कायम राहणार आहे. पुढील वाटचाल कशी करायची, याचे धोरण ठरवले जात असून दोन्ही पक्षांमध्ये कोणताही संघर्ष होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अनेक कार्यकर्ते दहा-दहा वर्षे पक्षासाठी काम करतात. त्यामुळे त्यांना संधी देताना अन्याय होणार नाही, याचा विचार केला जाईल. मागील निवडणुकीत ज्या ५० जागांवर विरोधक विजयी झाले होते, त्या जागांवर वाटाघाटी होतील. जिथे जिंकण्याची क्षमता आहे, अशाच उमेदवाराला दोन्ही पक्षांच्या सहमतीने संधी दिली जाईल.विजय शिवतारे, आमदार, शिवसेना