पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीसाठी मतदार यादी विभाजनाचे काम वेगाने सुरू झाले आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने 14 क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी सोपवली आहे. या कार्यालयांमार्फत विधानसभा मतदार यादीचे विभाजन करण्याचे आदेश जारी केले आहेत. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तयारीसाठी मतदार यादी विभाजनाचे काम वेगाने सुरू झाले आहे.(Latest Pune News)
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिलेल्या आदेशानुसार, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील उपलब्ध अभियांत्रिकी, आरोग्य निरीक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतदार यादी विभाजनाच्या कामात नेमणूक केली आहे.
येरवडा- धनोरी-कळस, नगर रोड-वडगाव शेरी, शिवाजीनगर-घोले रोड, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, धनकवडी-सहकारनगर, भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड आदी 14 क्षेत्रीय कार्यालयांचा यात समावेश असून, या कार्यालयांना संबंधित विधानसभा क्षेत्रानुसार प्रभाग क्रमांक निश्चित करून दिले आहेत. या आदेशामुळे महापालिकेतील निवडणूक तयारीला औपचारिक सुरुवात झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करून येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत.
निवडणूक कामासाठी अधिकाऱ्यांना आदेश
निवडणूक कामासाठी क्षेत्रीय कार्यालयांमधील उपलब्ध अभियांत्रिकी शाखाधिकारी, आरोग्य निरीक्षक आणि इतर विभागीय कर्मचारी यांना तत्काळ कार्यरत होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक कार्यालयाने यासंबंधी आदेशाची प्रत निवडणूक कार्यालयाकडे सादर करावी, असेही आदेशात नमूद आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विभाजनाचे काम पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पाडले जाणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी तातडीने काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका