Pune Waste Management Pudhari
पुणे

Pune Waste Management: पुणे महापालिकेचा स्वच्छतेचा मेगा प्लॅन; घंटागाड्या ९५२, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट

दररोज २,८०० टन कचऱ्याचे व्यवस्थापन; कचऱ्याचे हॉटस्पॉट हटविणार, मोठ्या कचरा उत्पादकांवर दंडात्मक कारवाईचा विचार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात दररोज स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरली असून, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कचरा संकलन आणि रस्त्यांची सफाई सुरू आहे. वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांवरील कचरा उचलण्यासोबतच शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने घंटागाड्यांची संख्या ९५२ पर्यंत वाढविली असून, झाडणकामासाठीचे मनुष्यबळही ४,५०० वरून ९,००० पर्यंत नेले आहे.

आता केवळ रोजची सफाई करण्यापुरते मर्यादित न राहता, कचऱ्याचे हॉटस्पॉट कायमस्वरूपी हटविणे, झोपडपट्टी भागांत नियमित कचरा संकलनाची व्यवस्था उभी करणे, ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी क्षमता वाढविणे आणि मोठ्या कचरा उत्पादकांना स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास प्रवृत्त करणे, असा व्यापक आराखडा महापालिकेने आखला आहे. नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेची ही मोहीम अधिक प्रभावी करण्यावरही प्रशासनाचा भर राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.

सध्या शहरात दररोज सुमारे २,८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये सुमारे १,८०० मेट्रिक टन सुका आणि १,००० मेट्रिक टन ओला कचरा असतो. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. या अंतर्गत शहरात ठेकेदारांच्या मार्फत कचरा उचलला जात आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी कचरा संकलन, रस्त्यांची सफाई, कचऱ्याची वाहतूक आणि त्यावर प्रक्रिया या चार टप्प्यांचे नियोजन गरजेचे असून, यातील प्रक्रिया क्षमतेच्या दृष्टीने महापालिकेने व्यवस्था उभी केली असून, वाहतूक आणि संकलन व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.

बल्क वेस्ट जनरेटर्सना लावणार कचरा व्यवस्थापनाची शिस्त

शहरात सुमारे २,८०० बल्क वेस्ट जनरेटर्सकडून दररोज सुमारे ४०८ मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये मोठ्या सोसायट्या आणि अन्य मोठ्या कचरा उत्पादकांचा समावेश आहे. नियमानुसार त्यांनी स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र योजना तयार करण्यात येत आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन झाले नाही, तर दंडात्मक कारवाईच्याही विचारात महापालिका आहे. याची अंमलबजावणी येत्या दोन ते अडीच महिन्यांत केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले.

क्रोनिक स्पॉटवर विशेष लक्ष

शहरातील वारंवार कचरा साचणाऱ्या ठिकाणांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका कर्मचारी, मुकादम आणि स्वच्छता निरीक्षकांशी संवाद साधण्यात आला आहे. विशेषतः झोपडपट्टी भागात घरांमध्ये कचरा साठविण्यासाठी जागा नसल्याने तो वारंवार रस्त्यावर टाकला जातो. काही भागांत कचरा संकलनाची व्यवस्था अपुरी, तर काही ठिकाणी संकलनाच्या फेऱ्या कमी असल्याने कचऱ्याचे साठे तयार होतात. या भागांमध्ये नियमित आणि एकसमान संकलन व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे.

ओल्या कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी महापालिकेकडून नवे नियोजन

ओल्या कचऱ्याची गरजेनुसार प्रक्रिया करण्यासाठी सध्याची सुमारे ६०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे. प्रस्तावित ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या प्रकल्पातून ४०० मेट्रिक टन ओल्या कचऱ्याची प्रक्रिया करण्याचे नियोजन असल्याचे नायर यांनी सांगितले. तसेच, दररोज ४०८ मेट्रिक टन कचरा निर्माण करणाऱ्या सुमारे २,८०० मोठ्या कचरा उत्पादकांना स्वतःच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नियमबद्ध योजना तयार केली जात आहे, असे अतिरिक्त आयुक्त नायर यांनी सांगितले.

नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा नवा प्रयोग

स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचाही त्यात सहभाग आवश्यक आहे. जानेवारीअखेर होणाऱ्या पुणे ब्रँड टूरपूर्वी प्रभागनिहाय स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन आहे. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महापालिका कर्मचारी यांच्या सहभागातून स्वच्छतेबाबत जनजागृती करून नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शहराची स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा संकलन, रस्त्यांची सफाई आणि प्रक्रिया व्यवस्थेला बळ दिले आहे. आता कचऱ्याचे हॉटस्पॉट कायमस्वरूपी हटविणे, ओल्या कचऱ्याची प्रक्रिया वाढविणे आणि बल्क वेस्ट जनरेटर्सना जबाबदार करणे, यावर भर आहे. नागरिकांच्या सहभागातून पुण्याची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम आणि शाश्वत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT