Health Monitoring Pudhari
पुणे

Pune Seasonal Disease Monitoring: पुणे महापालिकेची विशेष यंत्रणा; ताप-अतिसाराच्या रुग्णसंख्येवर ठेवणार लक्ष

पावसाळ्यानंतर संसर्गजन्य आजारांचा धोका; तीन ठिकाणी रुग्णसंख्येचे निरीक्षण, ७१ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाळ्यानंतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे महापालिकेने हंगामी ताप आणि तीव्र अतिसाराच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा सुरू केली आहे. रुग्णसंख्येत होणारी असामान्य वाढ वेळीच निदर्शनास आणून संभाव्य उद्रेक रोखणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे महापालिकेकडून पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

शहरातील तीन ठिकाणी या यंत्रणेद्वारे रुग्णांच्या आजारांचे स्वरूप आणि रुग्णसंख्येतील बदलांची नोंद केली जाणार आहे. ताप किंवा अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ आढळल्यास आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा तपासणी केली जाईल. आधुनिक निदान पद्धतींच्या मदतीने आजाराचे कारण आणि संसर्गाचे स्वरूप निश्चित करण्यावर भर राहणार आहे.

या कामासाठी महापालिकेच्या ७१ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रुग्णांची माहिती संकलित करणे, प्राथमिक निरीक्षण करणे, आवश्यक नमुने तपासणीसाठी पाठविणे आणि प्राप्त निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करणे, याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

पावसाळ्यानंतर दूषित पाणी, डासांची वाढ आणि बदलते हवामान यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. अशा वेळी एखाद्या भागात ताप किंवा अतिसाराच्या रुग्णांची संख्या नेहमीपेक्षा वाढल्यास तो संभाव्य उद्रेकाचा संकेत ठरू शकतो. त्यामुळे नियमित निरीक्षणातून अशा बदलांची माहिती आरोग्य विभागाला लवकर मिळणार असल्याचा दावा महापालिकेकडून पत्रकाद्वारे करण्यात आला.

रुग्णसंख्येतील वाढीचे संकेत मिळाल्यास संबंधित परिसरात तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक वेगाने करता येणार आहेत. प्रायोगिक टप्प्यातील या यंत्रणेच्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात तिचा विस्तार करण्याचा मार्गही मोकळा होणार असल्याचे पत्रकात नमूद केले.

प्रमुख मुद्दे

  • आवश्यकतेनुसार प्रयोगशाळा तपासणी

  • आधुनिक निदान पद्धतींचा वापर

  • संभाव्य उद्रेकांच्या ठिकाणांचा शोध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT