Fake Job Letter Pudhari
पुणे

Pune Municipal Recruitment Fraud: पुणे महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने ४५ लाखांचा गंडा; बनावट नियुक्तिपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

लेटरहेड, शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर; शिपायासह चौघांवर कारवाई, राजेंद्र खेडेकर यांनी आरोप फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे महानगरपालिकेतील विविध विभागांत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तिपत्रांच्या आधारे उमेदवारांची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जेजुरी देवस्‍थानचे विश्र्वस्‍त राजेंद्र बबन खेडेकर यांच्‍यासह महानगरपालिकेचे शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील, नमिता गोवर्धन बसनोडे, तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या भरती प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी शलाका विनायक ढोणे (वय ४७) यांनी फिर्याद दिली असून, मार्च २०२२ ते जुलै २०२६ या कालावधीत पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर व इतर ठिकाणी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपींनी पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत अनेक बेरोजगार युवक-युवतींकडून पैसे घेतले. त्यानंतर पालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट नियुक्तिपत्रे तयार करून ती खरी असल्याचा आभास निर्माण केला. तक्रारीनुसार, उमेदवारांकडून रोख तसेच धनादेशाद्वारे रक्कम स्वीकारली. अनेकांना नियुक्ती निश्चित झाल्याचे सांगून विश्वासात घेतले. मात्र, प्रत्यक्षात नियुक्ती न झाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. यामध्ये केवळ ४५ लाख रुपयांची फसवणुकीबरोबरच शासकीय कागदपत्रांची बनावट निर्मिती करून त्यांचा वापर करण्यात आल्याचाही आरोप केला आहे. शिवाजीनगर पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी आरोप फेटाळले

या प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्‍थानचे विश्र्वस्‍त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिलेल्‍या निवेदनात सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण स्वतः या प्रकरणातील तक्रारदार असून, अनेक पीडितांना पैसे परत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महापालिकेची नियुक्तिपत्रे, बदली आदेश, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, स्वाक्षऱ्या किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण आर्थिक व्यवहार, बँक खाते, कॉल रेकॉर्ड व डिजिटल पुराव्यांची निष्पक्ष चौकशी करून खरे दोषी समोर आणावेत आणि बदनामी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT