Ramps for Disabled Pudhari
पुणे

Pune Ramps for Disabled: दिव्यांगांसाठी पुणे महापालिकेचा मोठा पुढाकार; शहरातील ५० सार्वजनिक ठिकाणी रॅम्प उभारणार

‘बिल्डिंग अ पर्पल पुणे’ उपक्रमाला सुरुवात; बजाज फिनसर्व्हच्या सीएसआर निधीतून मिळणार सहकार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक तसेच हालचालींमध्ये अडचण असलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी सहज आणि सन्मानाने वावरता यावे, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी महापालिका आणि 'रॅम्प माय सिटी' यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात शहरातील ५० सार्वजनिक ठिकाणी व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी रॅम्प बसविण्यात येणार आहेत.

या कामासाठी बजाज फिनसर्व्हकडून सीएसआर निधीतून सहकार्य मिळणार आहे. महापालिका कार्यालये, सांस्कृतिक स्थळे, उद्याने आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांना प्रवेश करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रॅम्पमुळे व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसह ज्येष्ठ नागरिक आणि चालताना अडचणी येणाऱ्या नागरिकांनाही सार्वजनिक सुविधांचा अधिक सहजपणे वापर करता येणार आहे.

'बिल्डिंग अ पर्पल पुणे' या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे सर्व नागरिकांना समान आणि सहज वापरता यावीत, हा त्यामागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी रॅम्प उभारल्यानंतर पुढील टप्प्यांत दिव्यांगांना येणारे इतर अडथळे दूर करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी समान आणि सहज प्रवेश मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करताना दिव्यांगांच्या गरजांचा विचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी हा उपक्रम समावेशक पुण्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.

पुणे महानगरपालिका दिव्यांगांसाठी रॅम्प बांधणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, जिथे दिव्यांगांचा वावर आहे, त्या ठिकाणी प्राधान्याने रॅम्प बांधण्याचा विचार केला जावा. प्रामुख्याने गर्दीचा परिसर, ट्राफिकचे ठिकाण, याचा विचार महापालिकेने करणे गरजेचे आहे. तरच, हे रॅम्प फायदेशीर ठरतील, नाहीतर पैसे वाया जातील.
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरी मंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT