Historic Printing Press Pudhari
पुणे

Pune Mamarao Date Printing Press: पुणे महापालिकेच्या ऐतिहासिक मुद्रणालयाचे अस्तित्व धोक्यात; मामाराव दाते मुद्रणालयाला टाळे

घोले रस्त्यावरील मूळ जागी सिटी ग्रंथालय, वडगाव बुद्रुकमधील तात्पुरती जागाही बंद; शंभर वर्षांची परंपरा असलेल्या मुद्रणालयासाठी नव्या जागेचा शोध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या ऐतिहासिक ‘मुद्रणमहर्षी मामाराव दाते मुद्रणालया’च्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घोले रस्त्यावरील मूळ जागेवर सिटी ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेताना मुद्रणालयासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बांधकाम आराखड्यात मुद्रणालयासाठी जागाच ठेवण्यात आली नसल्याने या ऐतिहासिक वास्तूचा मूळ जागेवर परतण्याचा मार्ग कायमचा बंद झाला आहे. त्यातच वडगाव बुद्रुक येथील तात्पुरत्या जागेलाही महापौर मंजूषा नागपुरे यांच्या आदेशाने टाळे लावण्यात आल्याने मुद्रणालयाला आता नव्या जागेचा शोध घ्यावा लागत आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शंभर वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या मुद्रणालयाची परवड सुरू असल्याचे चित्र आहे.

घोले रस्त्यावरील महापालिकेच्या जुन्या मुद्रणालयाच्या जागेवर सिटी ग्रंथालय उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पासाठी तत्कालीन खासदार प्रकाश जावडेकर यांच्याकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. मात्र, या निधीच्या तुलनेत प्रकल्पासाठी महापालिकेला तब्बल २७ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. मुद्रणालयाची जुनी इमारत पाडून त्या जागेवर ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला नवीन इमारतीत मुद्रणालयासाठीही जागा उपलब्ध करून देण्याची चर्चा होती. त्यानुसार मुद्रणालय तात्पुरत्या स्वरूपात वडगाव बुद्रुक येथील शाळेच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात सिटी ग्रंथालयाच्या बांधकामाचा आराखडा तयार करताना मुद्रणालयासाठी जागेची तरतूदच करण्यात आली नाही. मुद्रणालयासाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली जाईल, असा ठराव सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी मान्य केला होता. तरीही या ऐतिहासिक मुद्रणालयासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करण्यात प्रशासनाला अपयश आले. परिणामी, घोले रस्त्यावरील मूळ जागेवर मुद्रणालय पुन्हा सुरू होण्याच्या शक्यता संपुष्टात आल्या आहेत.

आता वडगाव बुद्रुक येथील तात्पुरत्या जागेवरूनही मुद्रणालय हलविण्याचे आदेश महापौर नागपुरे यांनी दिले आहेत. तीन दिवसांपूर्वी या जागेला टाळे लावण्यात आल्याने मुद्रणालयाचे कामकाज आणि पुढील व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या भवन विभागाला शहराच्या उपनगरांमध्ये मुद्रणालयासाठी नवीन जागा शोधण्याची वेळ आली आहे. ऐतिहासिक मुद्रणालयाचे स्थलांतर करताना कायमस्वरूपी जागेची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मामाराव दाते यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी भाषेतील मजकुराचे आधुनिक पद्धतीने मुद्रण करण्यासाठी यांत्रिक प्रणाली विकसित केली होती. त्यांच्या योगदानाची दखल घेत महापालिकेने मुद्रणालयाला त्यांचे नाव दिले. मात्र, आता या ऐतिहासिक मुद्रणालयाला स्वतःची जागाच गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे, संबंधित परिसरात सिटी ग्रंथालय उभारण्याची मागणी नसतानाही हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या सिटी ग्रंथालयाच्या कामावर आतापर्यंत १२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी आणखी १५ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एकीकडे ग्रंथालयाच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या स्वतःच्या ऐतिहासिक मुद्रणालयासाठी जागा निश्चित झालेली नाही. त्यामुळे नियोजनातील त्रुटींचा फटका मुद्रणालयाला बसला असून, त्याचे भवितव्य अनिश्चित बनले आहे.

घोले रस्त्यावरील जागेवर सिटी ग्रंथालय उभारण्याचा निर्णय घेताना मुद्रणालयासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे ठरले होते. मात्र, प्रत्यक्ष बांधकाम आराखड्यात मुद्रणालयासाठी जागेची तरतूद करण्यात आलेली नाही. महापौरांनी वडगाव बुद्रुक येथील तात्पुरत्या जागेतून मुद्रणालय हलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मूळ जागेवर मुद्रणालय पुन्हा सुरू करणे शक्य नाही. आता मुद्रणालयासाठी नवीन जागा शोधण्याचे काम सुरू आहे.
बिपीन शिंदे, भवन विभागप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT