Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

PMC JE Recruitment Exam: महापालिका भरती परीक्षेतील ‘हायटेक’ चिटिंगचा पर्दाफाश; तिघांची उमेदवारी रद्द

९३ प्रश्न अर्ध्या तासात सोडवून सर्व उत्तरे अचूक; केंद्रावरील दोन कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)पदाच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा पर्दाफाश महापालिकेने केलेल्या चौकशीत झाला आहे. हायटेक पद्धतीने परीक्षेत तिघांनी चिटिंग केल्याचे उघड झाले आहे. संभाजीनगर येथील एका केंद्रावर हा गैरप्रकार झाला असून, त्यांना केंद्रावरील दोघांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिन्ही उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून, परीक्षा केंद्रावरील दोन कर्मचारी अशा पाच जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.

दरम्यान, १६९ पदांपैकी १४६ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे, असे नायर यांनी सांगितले. तसेच आधीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यास या पद्धतीने त्या परीक्षांची देखील चौकशी करण्यात येईल, असे नायर म्हणाले. महापालिकेने कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीसाठी जानेवारी २०२४ मध्ये ११३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पदसंख्या १६९ करण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये सुधारित जाहिरात काढण्यात आली. ऑनलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी 'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' (आयबीपीएस) कडे देण्यात आली होती.

कागदपत्रे पडताळणीसाठी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेतील एका प्रश्नाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले. या प्रश्नातील मजकूर आणि पर्यायांचा क्रम एका उमेदवाराच्या परीक्षेतील नोंदीशी जुळत असल्याने पेपरफुटीचा संशय व्यक्त झाला. त्यानंतर महापालिकेने आयबीपीएसला सखोल चौकशीचे निर्देश दिले. ऑनलाइन परीक्षेत प्रत्येक उमेदवारासाठी प्रश्न आणि पर्यायांचा क्रम संगणकीय पद्धतीने बदलला जातो. उमेदवाराने कोणता प्रश्न केव्हा पाहिला, उत्तर कधी नोंदविले, किती वेळ घेतला आणि उत्तरात बदल केला का, याची मिनिटागणिक नोंद डेटा लॉगमध्ये होते. या आधारे ५४५ उमेदवारांच्या उत्तरपद्धतीचे विश्लेषण करण्यात आले.

तपासात तीन उमेदवारांची उत्तर देण्याची पद्धत संशयास्पद आढळली. सुरुवातीला अनेक प्रश्न पाहणे. मात्र, उत्तरे नोंदवू नये आणि त्यानंतर वेगाने उत्तरे देणे, अशा विसंगती आढळल्या. एका उमेदवाराने परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासात तब्बल ९३ प्रश्न सोडविले आणि सर्व ९३ उत्तरे अचूक दिल्याचे डिजिटल नोंदीत दिसून आले. परीक्षा केंद्रातील दोन कर्मचाऱ्यांचा गैरप्रकारात सहभाग असल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला. दोघांना सेवेतून काढून टाकून त्यांचे 'रिसोर्स आयडी' बंद करण्यात आले आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएसच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा सहभाग आढळला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा थेट पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे हा प्रकार परीक्षा सुरू असतानाच करण्यात आलेल्या फसवणुकीचा असावा, असा प्रशासनाचा दावा आहे. १४६ पात्र उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून, १८ पदे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त ठेवण्यात आली आहेत. पाच उमेदवारांचे नियुक्ती आदेश विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत.

‘पेपर फुटला नाही; गैरप्रकाराचा संशय’

महापालिकेच्या भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. उपलब्ध डिजिटल नोंदींच्या आधारे परीक्षा सुरू असतानाच गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. सात सत्रांमध्ये प्रत्येकी वेगवेगळे १०० प्रश्न देण्यात आले होते. पेपरफुटी झाली असती तर परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या १५ ते ३० मिनिटांत मोठ्या प्रमाणात प्रश्न सोडविल्याचे डिजिटल नोंदीत दिसले असते. मात्र, तसे आढळले नाही. त्यामुळे पेपरफुटीपेक्षा उमेदवाराकडून परीक्षा सुरू असताना फसवणूक झाल्याचा संशय आहे.

...अशी झाली चिटिंग

चिटिंग करण्यासाठी आधुनिक कॅमेरा असलेल्या चश्मा वापरण्यात आल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. तपासणीत एका उमेदवाराच्या डिजिटल नोंदींचा तपशीलवार मागोवा घेण्यात आला. परीक्षा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला त्याने अनेक प्रश्न पाहिले; मात्र, उत्तरे सोडवली नाहीत. त्यानंतर तो तब्बल अर्धा तास वॉशरूममध्ये गेला. परत आल्यावर पुन्हा १० मिनिटांच्या अवधीने तो पुन्हा वॉशरूममध्ये गेला. दरम्यान, फोटो काढण्यात आलेले प्रश्न व रफ पेजवर लिहिलेले प्रश्न मोबाईलच्या साह्याने बाहेर पाठवण्यात आले. यानंतर हे प्रश्न एकाकडून सोडून घेऊन ते संबंधित विद्यार्थ्याला पाठवण्यात आले. या विद्यार्थ्याने परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासात ९३ प्रश्न सोडवून सर्व ९३ उत्तरे अचूक दिली. ५४५ उमेदवारांच्या नोंदींच्या विश्लेषणातून तीन उमेदवार संशयित आढळले. त्यापैकी एका उमेदवाराचा गैरप्रकार स्पष्ट झाला आहे. झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून, अन्य दोघांना नोटीस देण्यात आली आहे.

स्वच्छतागृहात जॅमरचा प्रभाव नसल्याचा संशय

परीक्षा केंद्रात जॅमर बसविण्यात आल्याने मोबाईलचा वापर रोखला जात होता. मात्र, स्वच्छतागृहात जॅमरचा प्रभाव नसल्याने तेथे गैरप्रकार झाल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 'अर्न्स्ट अँड यंग'कडूनही डिजिटल नोंदींचे स्वतंत्र विश्लेषण करण्यात आले असून, त्याचा अहवाल महापालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT