Pune Municipal Corporation Clash Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Clash: पुणे महापालिकेच्या सभागृहात गोंधळ; भाजप नगरसेवक गफुर पठाण यांच्या अंगावर धावले

पाणीप्रश्नावरील चर्चेदरम्यान सभागृहात तणाव; विरोधकांच्या हस्तक्षेपामुळे धक्काबुक्कीचा प्रकार टळला, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या मुख्यसभेत भाजपचे चार ते पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक गफुर पठाण यांच्या अंगावर धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे सभागृहात गोंधळ झाल्याने महापौरांनी सभा तहकूब केली. भाजप नगरसेवकांच्या कृत्याबद्दल महापौर मंजूषा नागपुरे यांनीही नाराजी व्यक्त केली.

शहरात सुरू झालेली पाणीकपात आणि त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय यावर महापालिकेच्या मुख्यसभेत चर्चा सुरू होती. या चर्चेत सहभागी झालेले नगरसेवक पठाण यांनी त्यांच्या भागातील पाणी प्रश्न मांडल्यानंतर बोपोडीतील प्रार्थनास्थळावर बोलण्यास सुरुवात केली. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी तत्काळ आक्षेप घेतला अन् चार ते पाच नगरसेवक थेट पठाण यांच्या दिशेने त्यांच्या अंगावर धावून गेले.

पठाण यांनीही तिंरगा ध्वज फडकावत मला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेले भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे, सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर, पुनित जोशी यांनी थेट पठाण यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना घेराव घातला. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सभा तहकूब करण्याचा आदेश दिला. त्याच वेळी विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन महापौरांच्या डायसपुढे भाजप नगरसेवकांची दादागिरी सुरू आहे. ते जात धर्मावरून बोलत असल्याची तक्रार केली. त्याचवेळी महापौरांनी सभा तहकूब केली. त्यामुळे गोंधळावर पडदा पडला.

नगरसेवकांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

नगरसेवक पठाण हे बोलत असतानाच आक्रमक झालेल्या भाजप नगरसेवक थेट त्यांच्या आसनाजवळ जाऊन अंगावर धावून जाऊ लागले. त्यावेळी राष्ट्रवादी पवार गटाचे गटनेते काका चव्हाण, नगरसेवक अविनाश साळवे, प्रशांत जगताप यांनी पुढे येऊन या नगरसेवकांना रोखले, त्यामुळे सभागृहातील धक्काबुक्कीचा प्रकार टळला.

महापौरांनी केली नाराजी व्यक्त

सभागृहात घडलेल्या या प्रकाराबद्दल महापौरांनी सभा संपल्यानंतर भाजप नगरसेवकांना बोलावून घेऊन नाराजी व्यक्त केली. तुम्ही जिथे आक्रमक व्हायला पाहिजे तिथे होत नाही आणि नको तिथे आक्रमक होता, असे सांगत त्यांनी या नगरसेवकांना खडसावले, तर गोंधळ सुरू असतानाच सभागृह नेते बिडकर यांनीही हा काय प्रकार आहे, अशी विचारणा करीत नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT