या सभागृहानं कुणाकुणाला पाहिलयं..? देशाचं राजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या, बिटिशांच्या सत्तेला हादरवून सोडणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांना... साहित्य क्षेत्रात अक्षरलेणी खोदणाऱ्या साहित्यशिल्पींना... तसंच काकडीप्रमाणं माणूस कापण्याचा गुन्हा नोंदलेल्या, तसंच दम देऊन महापालिकेचे ठेके मिळवणाऱ्या कंत्राटदार अन् नगरसेवकांनाही..!
पुण्यात 1857 मध्ये नगरपालिका स्थापन झाली आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1950 मध्ये तिचे रूपांतर महापालिकेत झाले. आधीच्या नगरपालिकेच्या आणि आताच्या महापालिकेच्या कारभारात काही शे नगरपिते-नगरसेवक झाले. नगरपालिकेच्या सुरुवातीच्या काळात फक्त सरकारनियुक्त सदस्य असत, तर नंतर नागरिकांमधून निवडून देण्याची पद्धत सुरू झाली. महापालिकेच्या स्थापनेनंतर मात्र सर्वच सदस्य नागरिकांमधून निवडून देण्यात येऊ लागले. प्रश्न असा येतो की, नगरपालिकेच्या काळात आणि त्यानंतर आता महापालिकेच्या पंचाहत्तर वर्षांतील निवडणुकांत विजय मिळवून सभागृहात आलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या गुणांचा आलेख हा असा उतरता का राहिला आहे..? पुणे नगरपालिका-महापालिकेमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन अशा अनेक क्षेत्रांतल्या मानदंडांचा वावर राहिला आहे. हा वावर नुसताच उपस्थितीपुरताच मर्यादित नव्हता, तर ते नगरपालिका-महापालिकेचे सदस्य होते आणि नुसते सदस्यही नव्हते, तर त्यांनी नगरपालिका-महापालिकेच्या कारभारात सक्रिय सहभाग नोंदवला आहे, पुण्याच्या विकासकामांमध्ये मोलाची भर टाकली आहे. त्यातील काही कामांनी तर अजूनपर्यंत आपला ठसा कायम ठेवला आहे.
पुण्याच्या या सभागृहानं ’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, या गर्जनेनं देशच नव्हे, तर इंग्लंडची भूमीही हादरवून सोडणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पाहिलंय...’शूद्रातिशुद्रांच्या वस्तीत पाणीपुरवठा का होत नाही’, असा सवाल करून बिटिश सरकारला धोरणं बदलायला भाग पाडणाऱ्या आणि व्हॉईसरॉयच्या स्वागतासाठी जनतेचा पैसा खर्च करायला विरोध करणाऱ्या महात्मा जोतिराव फुल्यांची पावलं याच सभागृहात पडली होती... आणि माणूस कापण्याचा गुन्हा नोंदलेल्या व्यक्तीही याच सभागृहात वावरल्या...
महात्मा गांधी यांनी ज्यांना आपला राजकीय गुरू मानलं आणि ज्यांनी महापालिकेचं सभागृह सर्वसामान्य पुणेकरांना खुलं केलं, त्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी याच सभागृहात प्रश्न विचारले. देशाचे उच्चायुक्त म्हणून बिटनमध्ये काम केलेले, पुण्यात लोकसभेला निवडून आल्यावरही महापौरपद स्वीकारणारे आणि कार्यक्रम वेळेत सुरू झाला नाही, म्हणून तडक तेथून निघून येणारे ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे याच सभागृहाचे अध्यक्ष होते.... आणि जवळच्या नातलगांच्या नावानं महापालिकेच्या कामांचे ठेके घेणारे माननीयही याच सभागृहाचे सदस्य होते.
साहित्यसमाट म्हणून विख्यात असलेले न. चिं. केळकर हे केवळ या सभागृहात सदस्य म्हणून बसले नव्हते, तर अध्यक्षांची खुर्चीही त्यांनी भूषवली होती. पुण्याचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. ते 1918 या वर्षी अध्यक्ष झाले, तर त्याआधी ते 1912 मध्ये पुणे नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते. चरित्र, तत्त्वज्ञान, कादंबऱ्या, नाटके आदी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या गाठीशी आहे आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या पानांची एकूण संख्या तब्बल पंधरा हजारांच्या घरात जाते. साहित्यिक म्हणून कारकीर्द गाजवण्याबरोबरच त्यांनी ’केसरी’चे संपादकपदही भूषवले होते. केळकर यांच्या थोडेसे आधी म्हणजे 1908 च्या दरम्यान लोकमान्य टिळक परदेशी गेले. त्या काळात ’केसरी’च्या संपादकपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी नंतर गांधीवाद स्वीकारत स्वत:चे नवा काळ वृत्तपत्र काढले. पत्रकारितेबरोबरच नाट्याचार्य खाडिलकर म्हणूनही ते प्रसिद्धीस आले. ’स्वयंवर’ ’मानापमान’ यांसारखी मराठी नाट्यसृष्टीत अजरामर ठरलेल्या नाटकांचे लेखन त्यांनी केले, ललित नाटके लिहिली. पुणे नगरपालिकेच्या त्यांच्या 1908 ते 1912 या काळातील सदस्यपदाच्या कारकीर्दीत त्यांच्या प्रतिभावान सहचर्याचा लाभ नगरपालिकेच्या सभागृहाला झाला.
बिटीश काळातील मंत्रिमंडळातच नव्हे, तर स्वातंत्र्यानंतरच्या पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातही मानाचे स्थान मिळवलेले नरहर विष्णू म्हणजेच काकासाहेब गाडगीळ हेही 1929 ते 1932 या काळात पुण्याचे नगरपिते होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे केरळकडे जात असलेली प्रतिष्ठेची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए पुण्यात आली. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा पुण्याला निश्चितच फायदा झाला. महात्मा फुले यांचे सहकारी असलेले निष्णात शल्यविशारद डॉ. विश्राम रामजी घोले यांनी 1877 ते 1895 अशी तब्बल अठरा वर्षे पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कामगिरी केली. जोतिरावांच्या सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष होतेच, पण स्त्री शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ कार्यकर्तेही होते. मुलींना शिक्षण नाकारणाऱ्या सनातनी समाजाने त्यांच्या सहा वर्षांच्या शिकणाऱ्या मुलीला काचांचे तुकडे असलेला लाडू खायला दिल्याने ती मृत्युमुखी पडली. स्त्री शिक्षणाच्या या पहिल्या बळीच्या नावाने बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोर बांधलेला हौद बाहुलीचा हौद म्हणून प्रसिद्ध झाला. पुणे नगरपालिकेचे सदस्य असण्याच्या काळात त्यांनी नगरपालिकेच्या वतीने ’उद्योगशाळा’ सुरू केली. कात्रजच्या तलावाचे पाणी पुण्यात आणण्याच्या, खडकवासला धरणातील पाणी शुद्धीकरण करून पुण्यात आणण्याच्या तसेच त्यावेळच्या लकडी आणि आताच्या संभाजी पुलाजवळ स्मशानाचा घाट बांधण्याच्या योजनेला त्यांनी गती दिली.
बहुजनांच्या शिक्षणासाठी श्री शिवाजी मराठा संस्थेचे रोपटे लावून त्याचा वटवृक्ष करणाऱ्या बाबुराव जगताप यांची गुरुवर्य ही पदवी पुणेकरांना सार्थ वाटते. शिक्षणाचा प्रसार करणारे बाबुराव नागरी संघटनेचे दहावे महापौर झाले आणि त्यांनी आदर्श घालून दिला. महापालिकेची मोटार त्यांनी नाकारली आणि पायी किंवा बसने महापालिकेत येणे पसंत केले. महापालिकेच्या खर्चाने चहा-बिस्किटे घेणे त्यांना मान्य नव्हते, ते घरून बिस्किटे आणत... बाबुरावांना जसे महापालिकेच्या सभागृहाने पाहिले तसेच याच महापालिकेत जुनी मोटार कितीही चांगल्या स्थितीत असो, नवी आलिशान मोटारींसाठी पैशांची उधळण करणारे नगरसेवकही याच सभागृहाने पाहिले...
बहुजन समाजाच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेले, शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र पक्ष काढणारे, जोतिरावांच्या सत्यशोधक विचाराचा प्रसार करणारे आणि त्यांच्या पुतळ्यासाठी पुढाकार घेणारे बहुजनांचे नेते केशवराव जेधे यांचा सहवास पुणे नगरपालिकेच्या सभागृहाला 1925 ते 28 या काळात लाभला. प्लेगच्या साथीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आणि पुढे ज्यांच्या नावाने पालिकेने रुग्णालय बांधले त्या डॉ. आर. के. नायडू यांनाही नगरपालिकेच्या सभागृहाने 1922 ते 1938 या काळात पाहिले.
...अशा दिग्गज, समाजकार्याला वाहून घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभलेल्या याच सभागृहाला पुढच्या काळात वेगळेच गुण असलेल्या नगरसेवकांना पाहण्याची वेळ का आली..? जवळच्या नातलगांच्या नावाने ठेके घेणाऱ्या, पाण्याचे बेकायदा नळ कनेक्शन देणाऱ्या, विधायक कामे अडवून त्यांना काम थांबवायची नोटीस देणाऱ्या, त्यासाठी अधिकाऱ्यांना दमात घेणाऱ्या किंवा त्यांनाही सामील करून घेणाऱ्या, मोठ्या वस्तीतल्या रस्त्याकडे दुर्लक्ष करून बिल्डरसाठीचा रस्ता प्राधान्याने करणाऱ्या, कामाचे अंदाजपत्रक फुगवणाऱ्या, बिल्डरशी भागीदारी करणाऱ्या, कागदावरचा झोन स्वार्थासाठी बदलणाऱ्या, डीपीतल्या आरक्षित जागांची पाहणी करून ती बदलण्यासाठी कोट्यवधींचा मलिदा लाटणाऱ्या नगरसेवकांनाही याच सभागृहाने पाहिले आहे... यांत काही अपवादही आहेत... पण पूर्वीच्या तत्त्वनिष्ठांपेक्षा अशा तत्त्वभष्टांची संख्या वाढते आहे, असे निश्चितच खेदाने नोंदवावे लागेल..!