

पाटस : कुसेगाव (ता. दौंड) येथे ग्रामदैवत श्री भानोबा देव यांची दोनदिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, यात्रा संपताच गावभर टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी नागरिकांच्या नाराजीत भर घातली आहे. गावातील मुख्य रस्ते, मंदिर परिसर, बाजारपेठ ते यात्रास्थळ सर्वच ठिकाणी प्लास्टिक, डिस्पोजेबल साहित्य, पाण्याच्या बाटल्या, ओला-सुका कचरा आणि चिखल झाला आहे.
यात्रेनंतर श्री भानोबा देव मंदिर परिसरात रिबनपट्ट्या, नारळ-हार, नैवेद्याचा कचरा व ओला कचरा पसरलेला दिसत आहे. युद्ध खेळाच्या कार्यक्रमांनंतर काठीवरील रिबन सर्वत्र विखुरलेली आहेत. डोंगरातील मंदिर परिसरात भाविकांनी जेवणावळींचा कचरा टाकून दिल्याने दुर्गंधी पसरली आहे. अन्नावळीच्या कचऱ्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले असून, दुर्गंधी पसरत आहे. ’यात्रा झालीः पण आता गाव स्वच्छ कोण करणार? हे चित्र दरवर्षीचेच आहे. यात्रेनंतर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते,’ असे ग्रामस्थ सांगतात.
मात्र, एक सकारात्मक बाजू म्हणजे, पाटस येथील सत्कर्म फाउंडेशन या समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते गेल्या 3 वर्षांपासून यात्रा संपल्यानंतर मंदिर प्रांगणात येऊन स्वच्छता करतात. ’ही देवसेवा आहे,’ असे ते सांगतात.
ग्रामपंचायतीने विशेष स्वच्छता पथक तातडीने तयार करावे, मंदिर परिसर निर्जंतुक करावा, कचरा व्यवस्थापनाची शाश्वत योजना आखावी, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व नागरिकांनी संयुक्तपणे गाव पूर्ववत करावे, अशा मागण्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.
भानोबा देव यात्रेपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात स्वच्छता केली जाते, तरुण मंडळीही स्वयंसेवेने कामाला लागतात. मात्र, यात्रा संपताच कचरा तसाच पडून राहतो आणि ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व नागरिक पुन्हा निष्क्रिय होतात, अशी ग्रामस्थांची खंत आहे.