Pune Encroachment Drive Pudhari
पुणे

Pune Encroachment Drive: पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; एका दिवसात १.८८ लाख चौरस फूट जागा मोकळी

वाघोली-केसनंद रस्त्यावर सर्वाधिक कारवाई; रविवारच्या सुटीतही अधिकारी रस्त्यावर, पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील अतिक्रमणांविरोधात महापालिकेने उघडलेली मोहीम आता अधिक आक्रमक झाली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या कठोर आदेशानंतर सलग पाचव्या दिवशीही अतिक्रमणांवर हातोडा पडला. रस्ते, पदपथ, इमारतींचे फ्रंट व साइड मार्जिन आणि अनधिकृत चौपाट्यांवरील रविवारी सुटी असतानाही दिवसभरात तब्बल एक लाख ८८ हजार ७५० चौरस फूट जागा मोकळी केली. वाघोली आणि केसनंद रस्त्यावर सर्वाधिक कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या मुख्यसभेत अतिक्रमणाबाबत प्रशासनावर झालेल्या टीकेनंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेत कारवाईची मोहीम सुरू केली आहे. केवळ रस्ते आणि पदपथांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामे तसेच बेकायदा चौपाट्यांनाही लक्ष्य केले आहे. रविवारी नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वाघोली आणि केसनंद रस्त्यावरील तब्बल ९५ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली.

बाणेर-बालेवाडी परिसरातील हाय स्ट्रीटवर ४१ हजार ५०० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त केली. तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ५२ हजार २५० चौरस फुटांवरील अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. अशा प्रकारे एकाच दिवसात एक लाख ८८ हजार ७५० चौरस फूट जागा महापालिकेने ताब्यात घेतली. दरम्यान, झोन सहामध्ये मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रविवारी कारवाई होऊ शकली नाही. मात्र, सोमवारच्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित दुकाने सील करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

सुट्टीच्या दिवशीही अधिकारी रस्त्यावर

रविवारची सुट्टी असतानाही अतिरिक्त आयुक्तांपासून नगर अभियंता आणि सहाय्यक आयुक्तांपर्यंतचे अधिकारी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी गंगाधाम चौक ते लुल्लानगर परिसरातील कारवाईची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. कारवाई अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आयुक्तांच्या निर्णयाचे शहरभर फ्लेक्स

अतिक्रमणांविरोधातील कारवाईला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. राजकीय दबावाला न जुमानता कारवाई सुरू ठेवल्याबद्दल आयुक्त राम यांच्या निर्णयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स शहरातील विविध भागांत लावण्यात आले आहेत. अतिक्रमणांमुळे गुदमरलेले रस्ते मोकळे व्हावेत, पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध व्हावेत आणि वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, अशी पुणेकरांची अपेक्षा असल्याचे या फलकांमधून म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT