Cleanliness Drive Pudhari
पुणे

Pune Cleanliness Drive: पुण्यात स्वच्छतेसाठी महापालिकेचा दणका; चार महिन्यांत 70 लाखांहून अधिक दंड

थुंकणे, उघड्यावर लघुशंका, प्लास्टिक वापरावर कडक कारवाई; 11 हजारांहून अधिक नागरिकांवर दंड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा धडाका सुरू केला असून, गेल्या चार महिन्यांत तब्बल 70 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर, अशा नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाने मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई केली आहे.

महापालिकेच्या ठोस घनकचरा व्यवस्थापन विभागाने ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत शहरातील विविध भागांत तपासणी मोहीम राबवली. या चार महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या 11 हजार 231 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत एकूण 70 लाख 35 हजार 929 रुपये दंड वसूल केला आहे. स्वच्छता नियमांची अंमलबजावणी अधिक कडकपणे केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिकेच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांवर किमान 180 रुपये ते कमाल 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. काही भागांत उघड्यावर कचरा टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारी नुसार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 77 नागरिकांकडून 77 हजार रुपये दंड वसूल केला आहे. उघड्यावर लघुशंका करणाऱ्या 2506 नागरिकांकडून 5 लाख 2 हजार रुपये वसूल केले आहेत.

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या 918 नागरिकांवर कारवाई करून 2 लाख 45 हजार रुपये दंड आकारला आहे. तसेच कचरा जाळण्याच्या 12 प्रकरणांतून 60 हजार रुपये वसूल केले आहेत. घरगुती कचरासंकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचरा देण्यास नकार देणाऱ्या 16 नागरिकांवरही कारवाई केली असून, त्यांच्याकडून 7,505 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे व घाण केल्याने सर्वाधिक म्हणजे 7,258 नागरिकांवर कारवाई करीत 38 लाख 98 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीसाठी विशेष मोहीम

बांधकामातील राडारोडा सार्वजनिक ठिकाणी टाकण्याच्या 76 प्रकरणांत कारवाई करून 5 लाख 48 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातही विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत 279 नागरिक व व्यावसायिकांवर कारवाई करीत 14 लाख 25 हजार रुपये दंड वसूल केला आहे. प्लास्टिकमुक्त शहरासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण करणे, कचरा जाळणे किंवा प्लास्टिकचा वापर केल्यास स्वच्छतेला बाधा पोहचते. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचीही तितकीच जबाबदारी आहे.
अविनाश सपकाळ, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT