Pune Municipal Corporation Tender Issue Pudhari
पुणे

Pune Road Tender Cancelled: पुण्यात ७५ कोटींची वादग्रस्त रस्ते निविदा रद्द; आयुक्तांचा मोठा निर्णय

पुढारीच्या वृत्ताची दखल; आता सात झोननुसार १० कोटींची स्वतंत्र पॅकेजेस, छोट्या ठेकेदारांना संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील रस्त्यांच्या दुरुस्ती व पुनर्डांबरीकरणासाठी काढण्यात आलेली तब्बल ७५ कोटी रुपयांची वादग्रस्त निविदा दैनिक 'पुढारी'च्या वृत्ताची दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि. १०) अखेर रद्द केली. या कामांचे आता क्षेत्रनिहाय विभाजन करून दहा-दहा कोटी रुपयांचे स्वतंत्र पॅकेज तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी पथ विभागाला दिले आहेत. त्यामुळे मोठ्या ठेकेदारांपुरती मर्यादित राहणारी निविदा प्रक्रिया अधिक खुली होऊन छोट्या व मध्यम ठेकेदारांनाही सहभागी होता येणार आहे. परिणामी, निविदांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. आयुक्त राम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दै. 'पुढारी'ने शनिवारी (दि. ८) तारखेला 'रस्त्यांच्या ७५ कोटींच्या निविदेत अपात्र ठेकेदाराला पात्र करण्याचा घाट' या मथळ्याखाली वृत्त दिले होते. महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील विविध रस्त्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्डांबरीकरणासाठी ७५ कोटी रुपयांची एकत्रित निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेतील आर्थिक व तांत्रिक अटी पूर्ण करणे छोट्या व मध्यम ठेकेदारांसाठी अवघड ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठ्या ठेकेदारांनाच या निविदेत सहभागी होण्याची संधी मिळेल, अशी चर्चा होती.

तसेच, एकाच ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणावर काम सोपविल्यास कामाचा दर्जा, वेळेत पूर्तता आणि नियंत्रण याबाबतही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, या निविदेवर कॉंग्रेसने आक्षेप घेत यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. कॉंग्रेसने केलेल्या आरोपावरून राजकीय वादंग देखील झाले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त राम यांनी निविदेची फेररचना करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, तीन निविदा काढण्यापेक्षा ७ झोननुसार १० कोटींच्या स्वतंत्र निविदा काढण्यात याव्यात.

यावर झोन अभियंत्यांचे नियंत्रण राहणार असून, या निविदा प्रक्रियेच्या अटी व शर्थी नव्याने काढणीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया आयुक्तांच्या निगराणीखाली राबवली जाणार आहे. निविदांचे विभाजन झाल्याने अधिक ठेकेदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन महापालिकेला अधिक चांगल्या दरात कामे करून घेता येतील. तसेच कामांचा दर्जा, कामाचा वेग आणि प्रशासनाचे नियंत्रण सुधारण्यास मदत होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. नवीन निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी पथ विभागाला दिल्या आहेत.

शहरातील रस्त्यावरील खड्डेदुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांच्या तीन निविदा काढण्यात आल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया रद्द करून आता नव्याने राबविण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील ७ झोननुसार १० कोटी रुपयांच्या निविदा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी अटी व शर्ती नव्याने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT