Election Ticket Rush Pudhari
पुणे

Election Ticket Rush: टिकिटासाठी इच्छुकांची धावपळ! आरक्षण सोडतीनंतर पुण्यात राजकारण तापले

पॅनल जुळवण्यासाठी पक्ष कार्यालयांत गर्दी; महिला आरक्षणामुळे नव्या समीकरणांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोडतीनंतर प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांनी तिकीट मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तर चार सदस्यांचा प्रभाग असल्याने काही उमेदवारांनी पॅनलची जुळवाजुळव करण्यासाठी सक्षम उमेदवारांची चाचपणी करण्यास देखील सुरुवात केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड आरक्षणे निश्चित होताच शहरातील निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. ज्यांना आरक्षणे अनुकूल झाली आहे त्यांनी तिकिट मिळवण्यासाठी शर्यत सुरू केली आहे. परिणामी, शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. महापालिकेतील एकूण 165 नगरसेवक जागांसाठी यंदाच्या निवडणुकीत 41 प्रभागांमध्ये लढत होणार आहे. त्यापैकी 40 प्रभाग चार सदस्यीय असून, 38 क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. या 165 जागांपैकी 50 टक्के म्हणजे 83 जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर उर्वरित 82 जागा पुरुष उमेदवारांसाठी आहेत. अनुसूचित जातींसाठी 22, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि ओबीसींसाठी 44 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षण निश्चित झाल्याने प्रत्येक पक्षात आता पॅनलमध्ये कोणाला संधी द्यायची यासाठी अंतर्गत चर्चा, गाठभेटी आणि राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत.

भाजपकडून निवडणूक स्वबळावर लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे लढण्याचा पर्याय तपासत आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे महाविकास आघाडीच्या स्वरूपात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी संभाव्य पॅनलची जुळवाजुळव सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांनी नेत्यांचे दरवाजे ठोठावले आहेत.

महायुतीतील कोणत्याही पक्षाशी आमची युती नाही

‌‘पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही सातत्याने लढलो आहोत. आगामी महापालिका निवडणुकीतही आमचा लढा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच राहील. महायुतीतील कोणत्याही पक्षाशी आमची युती होणार नाही,‌’ असे काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. तर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‌‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जर महायुतीतील कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही, हे स्पष्ट केले तरच काँग्रेस त्यांच्यासोबत आघाडी करेल.‌’

पक्ष कार्यालये गर्दीने फुलली

चार सदस्यांच्या प्रभागात निवडून येणे अपक्ष उमेदवारासाठी कठीण असते. त्यामुळे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाकडून उमेदवारी मिळवल्याने निवडणूक सोपी होते. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक पक्ष कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. भाजपच्या तिकिटावर निवडणुका लढवण्यास अनेक इच्छुक आहेत, परंतु जर भाजपने संधी दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

एका कुटुंबात एकच तिकीट : काँग्रेसचा निर्णय

आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये समीकरणे पालटली आहेत. काही ठिकाणी अनुकूल आरक्षण मिळाल्याने एकाच कुटुंबातील सदस्य निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. या संदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले, “काँग्रेस पक्ष एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच तिकीट देईल,” असा स्पष्ट निर्णय पक्षाने घेतला आहे.

पत्नी किंवा कुटुंबातील महिलांना उभे करण्याची तयारी

महानगरपालिकेतील 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी राखीव आहेत. ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले आहे तिथे अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील महिलांना निवडणूक रिंगणात उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावर पत्नी, आई किंवा मुलीच्या नावाने बॅनर, फ्लेक्स आणि पोस्ट लावून प्रचाराला सुरुवात देखील करण्यात आली आहे. आरक्षणामुळे काही इच्छुकांंची अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांनी देखील पत्नीला किंवा कुटुंबातील महिलेला निवडणुकीत उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेल्या महिला देखील आता फ्लेक्सवर झळकू लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT