

सुनील माळी
ता गिरीश बापट यांना नेमके ओळखणाऱ्यांना बापटांची प्रतिक्रिया काय आली असेल? याचा अंदाज येईल. त्यांनी त्या कार्यकर्त्याला विचारले, ‘तुला निवडणुकीला उभं राहायचंय का? काहीच हरकत नाही...; पण मला दोन प्रश्नांची उत्तरं दे... तू राहतोस त्या भागातला सॅनिटरी इन्स्पेक्टर कोण आहे, त्याचं नाव काय आणि फोन नंबर काय... तसंच दुसरा प्रश्न... तू राहतोस, त्या भागाचं रेशनिंग ऑफिस कुठंय? तिथल्या रेशनिंग ऑफिसरचं नाव-नंबर काय...’
दोनच प्रश्न... पण, त्याने हा नवा कार्यकर्ता गडी बावरला. त्याने ‘मला माहिती नाही’ अशी नकारार्थी मान हलवली... हे उत्तर आलं...; मग बापट चिडले... ते म्हणाले, ‘तुला महापालिकेत कशासाठी जायचंय? नगरसेवक कशासाठी व्हायचंय?... तुझ्या भागातल्या नागरिकांची कामं करायची आहेत म्हणून का आणखी कशासाठी?... तुला नगरसेवक व्हायचं असे तर तुला आधी कार्यकर्ता म्हणून नागरिकांची कामं केली पाहिजेत... त्यांची कामं कोण करतं, याची माहिती तुला हवी. ती करणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्यालयं कुठं आहेत? त्यांचे नंबर काय आहेत? ते तुला माहिती हवं. तू अनेकांची कामं त्यांच्याकडनं केलेली असली पाहिजेत, तरच तू नगरसेवक बनून उपयोग आहे. ‘झाला कार्यकर्ता आणि बनला नगरसेवक’ असं होत नसतं...’ बापटांनी असं ठणकावल्यावर तो नवथर कार्यकर्ता वरमला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला...
हा किस्सा प्रातिनिधिक आहे. कारण, राजकारणात आल्यावर केवळ पांढरे कपडे घालून नेत्याच्या मागे-पुढे करून, पक्षाच्या कार्यालयात केवळ कार्यक्रमापुरते उपस्थित राहून आणि फक्त फोटो काढण्याची वेळ अचूक साधून आपल्याला नगरसेवक होता येते, असा गैरसमज वाढू लागला होता. पक्षावर निष्ठा असणारा, नागरिकांशी आपली नाळ घट्ट जुळलेली असलेला पूर्वीचा कार्यकर्ता होता. सच्च्या, हाडाच्या कार्यकर्त्याचा नागरिकांशी सातत्याने संपर्क असे. प्रत्येक चाळीत, चार-पाच मजली अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर कोण राहते, त्यांच्या घरात किती जण आहेत, त्यापैकी मतदार किती आहेत, त्यांचा व्यवसाय काय आहे आदी अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला पाठ होती. केवळ निवडणुकीपुरता नव्हे, तर एरवीही अनेकदा त्याचा या रहिवाशांशी संपर्क येई. कोणाला महापालिकेतला दाखला हवा असेल, कोणाच्या अंगणातले गटार तुंबले असेल, कोणाच्या घरातील पाण्याचा दाब अचानक कमी झाला असेल, कुठे कचरा साठून राहिला असेल, एक ना दोन. या सर्वांकडून अशा संपर्क असलेल्या कार्यकर्त्यालाच हक्काने हाक मारली जायची आणि तो कार्यकर्ताही अर्ध्या रात्री मदतीला उभा असायचा. पक्षाची निवडणूक आली की विचारायलाच नको...’ सतरंज्या उचलण्यापासूनची कामं केलीयेत आम्ही...’ हे वाक्य तर आपण सर्वांनीच अनेक वेळा ऐकलं आहे... पक्षाच्या उमेदवाराची परिचयपत्रके नेऊन दे, स्लिपवाटपाची फेरी कर, उमेदवाराबरोबर ‘हाऊस टू हाऊस’ मोहिमेत उत्साहाने भाग घे... असा कार्यकर्ता घडत होता, समाजात रुजत होता.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत काँग््रेासेतर पक्षांच्या नशिबी कायम विरोधी पक्षाचा शिक्का असायचा. प्रत्येक निवडणुकीनंतर नव्या उत्साहाने लोकांना भिडायचे, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा, त्याचा परमोच्च बिंदू निवडणुकीत गाठायचा..., पण निवडणुकीत हमखास हार मिळायची. तरीही त्यानंतर पुन्हा उत्साहाने कामाला लागायचे. या कार्यकर्त्यांची पक्षाशी निष्ठा अशी असायची की कायम विरोधात बसावं लागलं तरी चालेल; पण चुकूनही दुसऱ्या पक्षात जायचा विचार येणार नाही. आपल्या पक्षाची जी काही तत्त्वे असतील, त्यांच्याशी प्रामाणिक राहणारा हा कार्यकर्ता होता.
पण काळ बदलत गेला आणि सर्वच क्षेत्रांतली मूल्ये जसजशी पातळ होऊ लागली, तसतशी राजकारणातली मूल्येही पातळ होऊ लागली. कामाने कार्यकर्त्याची ओळख होत होती; पण आता आपलं नुसतंच नाव झळकलं पाहिजे, असे प्रयत्न त्याच्याकडून होऊ लागले. त्यामुळे नेत्याच्या वाढदिवसाला चौकांत फ्लेक्स लावून नेत्याबरोबरच आपलीही मोठी छबी झळकवण्यातच धन्यता मानली जाऊ लागली. दिवाळी शुभेच्छांच्या फ्लेक्सने चौक भरू लागले आणि त्यामुळे परिसर विद्रूप होतो आहे, याचे भान सुटू लागले. निवडणुकीतही तंगडतोड करून मतदारांचे घर गाठण्याचे परिश्रम आता नकोसे वाटू लागले. जयंत्या-मयंत्या, स्वच्छता मोहीम, पक्षाची आंदोलने यांच्यात केवळ फोटोसाठी पुढेपुढे करायचं, लोकांसाठी काही विधायक कामं करण्यापेक्षा केवळ ‘पुतळ्याला पुष्पहार’सारख्या दिखाऊ कार्यक्रमांची रेलचेल वाढली.
पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या घटत गेली अन् एखाद्या पक्षाची सद्दी येते आहे, असे दिसले की लागलीच त्या पक्षाच्या नेत्याची हांजीहांजी करण्याची आणि योग्य वेळी त्या पक्षात उडी मारण्याची मुत्सद्देगिरी कार्यकर्त्याच्या अंगवळणी पडू लागली. प्रत्यक्ष कामाच्या सोसापेक्षा सोशल मीडियावरची आपली प्रसिद्धी आता कार्यकर्त्याला महत्त्वाची वाटू लागली. त्या आभासी दुनियेत सगळेच काही आभासी असल्याने केवळ कार्यकर्त्याचे फोटो रोज चमकत गेले, की तो कार्यकर्ता खूप काम करतो, असा भास निर्माण होतो आणि फसवणुकीला सुरुवात होते. यामुळेच नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना बापटांचा तो प्रश्न विचारावासा वाटतो, ‘तुझा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोण..?’