

बारामती: लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांपुढे खरोखरच प्रश्न निर्माण झाला होता. शरद पवार यांच्यावर बारामतीकरांचे प्रेम आहे, तसेच माझेही प्रेम आहेच ना, का प्रेम नसावे? पण, मी राजकीय भूमिका वेगळी घेतली.
शेवटी राजकारणात दिलदारपणा, मनाचा मोठेपणा महत्त्वाचा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. बारामतीत राष्ट्रवादी भवनात बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालपर्यंत शरद पवार आणि मी एकत्र होतोच ना. शरद पवार यांच्यामुळेच मी पहिल्यांदा निवडून आलो. मी काही आभाळातून पडलो का? असा सवाल करून अजित पवार म्हणाले, राजकारणात संकुचित विचारांचे राहून चालत नाही. माणसं जोडायची असतात. काही गोष्टी घडतात; पण झालं गेलं गंगेला मिळालं, असे म्हणत पुढे जायचे असते, असेही पवार म्हणाले.
तुम्हाला विकास हवा की गटातटाचे राजकारण? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्ही माझे ऐकले, तर मी तुमचे ऐकेल आणि विकासाची गती कायम ठेवेल, असे प्रतिपादनही अजित पवार यांनी केले, ते म्हणाले बारामती हे माझे ‘होम ग््रााउंड’ असल्याने इथे मला अधिक लक्ष द्यावे लागेल. 17 तारखेपर्यंत एबी फॉर्म द्यायची मुदत आहे. पण, मी लवकरच बारामती व माळेगावचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात करणार आहे.
राष्ट्रवादीकडे तिकीट मागणारे सर्वजण तोलामोलाचे आहेत. परंतु, जागा मर्यादित असल्याने काहींना थांबावे लागेल. त्यामुळे निवडणुकीत रुसवे-फुगवे, गटतट नकोत. आपण एकसंध असलो, तर कोण मायेचा लाल आपल्याला अडवू शकत नाही. तुम्ही मला जेवढा मोठा विजय मिळवून द्याल तेवढा माझा मान वाढणार असल्याचे पवार म्हणाले.