Pune Mumbai Expressway Pudhari
पुणे

Pune Mumbai Expressway Missing Link: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ‘मिसिंग लिंक’पूर्वी दुरुस्ती; तडे गेलेले रस्ते दुरुस्त

1 मेपर्यंत 13 किमी मार्ग खुला करण्याची तयारी; 142 पॅनेलची पुनर्बांधणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

सुनील कडूसकर

पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली यादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनापूर्वीच संपूर्ण महामार्ग गुळगुळीत करण्याचा चंग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधला आहे. मिसिंग लिंकचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून, सध्या त्यावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे.

येत्या 1 मे रोजी सुमारे 13 किलोमीटर लांबीचा हा मार्ग खुला करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र, या मिसिंग लिंकच्या प्रारंभापाशी तसेच शेवटच्या टोकाशी असलेल्या रस्त्याचा भाग सध्या अतिशय वाईट अवस्थेत आहे. द्रुतगती मार्गाच्या काँक्रीटच्या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, काही ठिकाणी तर खड्डेही पडल्याचे दिसतात. त्यामुळे तडे गेलेल्या या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

एकीकडे सहा ते सात हजार कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेला मिसिंग लिंक प्रकल्प, तर दुसरीकडे वेळीच दुरुस्ती देखभाल न झाल्याने जागोजागी तडे गेलेला द्रुतगती महामार्ग, असे चित्र सुमारे 95 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याने प्रवास करताना अनुभवास येते.

2002 साली वाहतुकीस खुला करण्यात आलेल्या या महामार्गावरील सिमेंटच्या पॅनेलना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. विशेषतः बऊर, कामशेत, मळवली आणि खोपोली परिसरात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. गेल्या 20-22 वर्षांत विविध पद्धतीने त्याच्या दुरुस्तीचे प्रयत्न झाले, तरीही रस्त्याला तडे जाण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.

द्रुतगती महामार्गावरील बऊर, कामशेत, मळवली, खोपोली अशा भागांत अनेक ठिकाणी सिमेंटच्या पॅनेलना तडे गेले असून, त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तडे गेलेले सिमेंट काँक्रीटचे 142 पॅनेलची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, मिसिंग लिंकच्या उद्घाटनापूर्वी हे काम पूर्ण होईल. त्यामुळे मिसिंग लिंकच्या उद्घाटनापूर्वीच पुणे-मुंबई यादरम्यानचा रस्ता पूर्वीप्रमाणे गुळगुळीत होईल.
राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT