Mumbai Pune Expressway Missing Link Pudhari
पुणे

Pune Mumbai Expressway Rockfall Protection: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या ‘कनेक्टिंग लिंक’वरील रॉकफॉल प्रोटेक्शन नोव्हेंबरपर्यंत; ३० टक्के काम पूर्ण

आयआयटी मुंबईच्या शिफारशीनुसार डोंगर उतारावर स्टील जाळी व बॅरिअर्स; मुसळधार पावसामुळे कामाला विलंब

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील 'कनेक्टिंग लिंक' मार्गावरील दरडी आणि खडक कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी सुरू असलेले अतिरिक्त रॉकफॉल प्रोटेक्शनचे काम आता नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या शिफारशीनुसार हे काम हाती घेण्यात आले असून, मुसळधार पावसामुळे कामाला विलंब झाला आहे. सध्या ३० टक्के काम पूर्ण झाले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) डोंगर उतारावर हाय-टेन्साईल स्टील जाळी आणि स्टील बॅरिअर्स बसविण्यात येत आहेत. सध्या या कामापैकी सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला हे काम सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, पावसामुळे कामाचा वेग मंदावल्याने अंतिम मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

६ जुलैच्या दरडीने दिला धडा

६ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे एक्स्प्रेस-वेवर सुमारे २० तास वाहतूक कोंडी झाली होती. डोंगरावरील मोठमोठे दगड रस्त्यावर कोसळल्याने टनेल क्रमांक-२ च्या प्रवेशद्वाराजवळील फ्रेमचे नुकसान झाले होते. यातील काही दगडांचे वजन तब्बल १७ ते २० टनांपर्यंत होते. तसेच, डोंगर उतारावरून वाहणारे पाणी रस्त्यावर येत असल्यानेही धोका निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधून आणलेली स्टीलची सुरक्षा जाळी डोंगर उतारावर बसविण्यात येत आहे. ही जाळी सैल खडकांना अडविण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यासोबत स्टील बॅरिअर्सची उभारणी करण्यात येत असून, उंच उतारावरून खाली येणाऱ्या मोठ्या दगडांपासून मार्गाचे अतिरिक्त संरक्षण होणार आहे.

दरम्यान, टनेलच्या प्रवेशद्वाराजवळील नुकसानग्रस्त फ्रेम पुन्हा बसविण्यात आली आहे. जाळी बसविण्यासाठी ड्रिलिंग आणि अँकरिंगची कामे करावी लागत असल्याने त्यासाठी तुलनेने कोरडे हवामान आवश्यक आहे. पावसाळा कमी झाल्यानंतर कामाला वेग देण्यात येत असून, नोव्हेंबरमध्ये संपूर्ण सुरक्षा उपाययोजना पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT