Niranjan Davkhare MPSC Protest Pudhari
पुणे

Niranjan Davkhare MPSC Protest: पुणे बंदची भूमिका घेणाऱ्यांना पुणेकरच धडा शिकवतील: निरंजन डावखरे

एमपीएससी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट; अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून डावखरेंचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे हे नेहमी सर्वांना दिशा देण्याचे काम करते. पुणे बंद करण्याची भूमिका घेतली जात असेल तर पुणेकरच त्या लोकांना कसे बंद करतील, हे कळणार नाही. पुण्याशी कोणी पंगा घेऊ नये, असा माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे, असे प्रतिपादन विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

एमपीएससीच्या परीक्षापद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्या अभ्यासिका येथे गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचा दावा डावखरे यांनी या वेळी केला.

अधिवेशनामध्ये आम्ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्याने मांडत आलो आहोत. स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत विद्यार्थ्यांच्या तीन-तीन तास बैठका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या असून, आणखी काही मागण्या असतील तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आंदोलनस्थळी आलो आहे, असे डावखरे म्हणाले.

एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ही मागणी विद्यार्थ्यांची आहे की, काही लोकांना यातून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे, हा मूळ प्रश्न आता निर्माण झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना भेटून प्रश्न मांडा

रोहित पवार हे स्वतः आमदार आहेत. ते हक्काने मुख्यमंत्र्यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडू शकतात. अधिवेशनातही हे मुद्दे उपस्थित करता येतात. आमदार म्हणून आपल्याकडे अनेक आयुधे असल्याचे डावखरे यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT