Pune Housing Project Issue Pudhari
पुणे

Pune Fire NOC Controversy: ‘मॉन्टेरोजा’ प्रकल्पाला अपूर्ण फायर सिस्टिमवरच एनओसी; रहिवाशांचा गंभीर आरोप

सिंहगड रस्त्यावरील 31 मजली इमारतीत सुरक्षेचा प्रश्न; चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड रस्त्यावरील ‌‘मॉन्टेरोजा‌’ या गृह प्रकल्पामधील अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित नसतानाही अग्निशमन दलाकडून या प्रकल्पाला ‌‘ना हरकत प्रमाणपत्र‌’ (फायर एनओसी) देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील रहिवाशांनी हा आरोप केला असून, फायर सिस्टिमच कार्यरत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हिंगणे खुर्द येथील ‌‘मॉन्टेरोजा‌’ या बांधकाम प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानाही महापालिकेकडून भोगवटा पत्र देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आता त्यानंतर ‌‘फायर एनओसी‌’संबधीचा आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, या गृह प्रकल्पाला पालिकेच्या अग्निशमन विभागाने 21 जानेवारी 2022 ला ‌‘ना हरकत प्रमाणपत्र‌’ दिले आहे. मात्र, दि. 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केली नव्हती.

त्यानंतर एका काही मजल्यावर अलार्म बसविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप संपूर्ण प्रकल्पातील फायर सिस्टिम कार्यान्वित झालेली नाही. ही इमारत तब्बल 31 मजली असून, आग लागल्यास फायर सिस्टीमअभावी मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे फायर सिस्टिमचे काम अपूर्ण असतानाही अग्निशमन दलाने कोणत्या आधारावर ‌‘ना हरकत प्रमाणपत्र‌’ दिले, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी चौकशी करून अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‌‘मॉन्टेरोजा‌’ प्रकल्पातील रहिवाशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT