Rose Exhibition Pudhari
पुणे

Pune Rose Flower Exhibition: पुण्यात रंगली गुलाबांची रंगतदार दुनिया; ५०० हून अधिक गुलाबपुष्पांचे प्रदर्शन

टिळक स्मारक मंदिरात ११३ व्या पावसाळी गुलाब प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रविवारीही प्रदर्शन विनामूल्य खुले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुलाबी, पांढरा, निळा, केशरी, जांभळा आणि पिवळा अशा विविध रंगांच्या गुलाबपुष्पांच्या दुनियेत पुणेकर रमले अन् पुष्प पाहून प्रत्येकाचे चेहरे आनंदाने फुलले. निमित्त होते टिळक स्मारक मंदिरात आयोजित पावसाळी गुलाबपुष्प प्रदर्शनाचे. शनिवारी प्रदर्शनाला उत्साहात सुरुवात झाली.

गुलाबप्रेमींचा पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाजूक पाकळ्या, लहान-मोठ्या आकारांची फुले आणि आकर्षक पुष्परचना पाहण्यासाठी तरुणाईसह पुष्पप्रेमींनी मोठी गर्दी केली.

दी रोझ सोसायटी ऑफ पुणेतर्फे आयोजित ११३ व्या पावसाळी गुलाब प्रदर्शनाचे उद्घाटन विदर्भ रोझ सोसायटीचे अध्यक्ष रमेशसिंग ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष गणेश शिर्के, कार्याध्यक्ष अनुपमा बर्वे, कार्यवाह नीलेश आपटे, हर्षद भिवंडीवाला आदी उपस्थित होते.

संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या विजय पोकर्णा सुवर्णपदक पुरस्काराने बंगाल रोझ सोसायटीचे सचिव संजोय मुखर्जी यांना गौरविण्यात आले. स्वप्न हलदार यांना 'एनसीएल ब्रीडर पुरस्कार' देऊन सन्मानित केले. हे प्रदर्शन सोसायटीचे माजी अध्यक्ष दिवंगत रामराव जगताप यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आले आहे.

या वेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक उपस्थित होत्या. प्रदर्शनात ५०० हून अधिक भारतीय गुलाबपुष्पांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. रंगबिरंगी गुलाबांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तनुजा बनके यांनी सूत्रसंचालन केले, तर गौरी अभ्यंकर यांनी आभार मानले. रविवारी (दि. ४) सकाळी ९ ते रात्री साडेआठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT