Pune Metro  Pudhari
पुणे

Pune Metro Student Pass: पुणे मेट्रोच्या विद्यार्थी पासला जोरदार प्रतिसाद; ३७ हजार ७२५ स्टुडंट कार्डचे वाटप

शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा डिजिटल प्रवासाला पसंती; ‘वन पुणे स्टुडंट पास’मुळे ३० टक्के सवलतीचा लाभ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महामेट्रोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विशेष ‘एमटीएस स्टुडंट महा कार्ड’ (विद्यार्थी पास) योजनेला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन प्रवासाचा खर्च वाचवण्यासाठी तसेच त्रासमुक्त डिजिटल प्रवासासाठी विद्यार्थ्यांनी या कार्डला पसंती दिली असून, आत्तापर्यंत महामेट्रोने ३७ हजार ७२५ पेक्षा जास्त विद्यार्थी पासचे वाटप केले आहे.

मेट्रो प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या या 'एमटीएस स्टुडंट महा कार्ड'मुळे विद्यार्थ्यांना मेट्रो तिकिटाच्या दरामध्ये थेट सवलत मिळते. यामुळे दैनंदिन कॉलेज, शाळा आणि क्लासेससाठी मेट्रोने प्रवास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मेट्रो स्टेशनवरील लांबलचक रांगा टाळून थेट स्मार्ट कार्ड स्वॅप करून प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाल्याने विद्यार्थी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत.

महामेट्रोची डिजिटल क्रांती; ३३ हजार ४७८ कार्ड्सची विक्री

फक्त विद्यार्थीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या पुणेकरांमध्येही महामेट्रोच्या विविध स्मार्ट कार्ड्सची मोठी क्रेझ दिसून येत आहे. महामेट्रोने उपलब्ध करून दिलेल्या सर्व प्रकारच्या 'महा कार्ड्‌स'ची एकूण विक्री १ लाख १६ हजार ८४२ च्या पुढे गेली आहे. यात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) ची एकूण विक्री ४५ हजार ६३९ झाली असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी असणाऱ्या 'एमटीएस महा कार्ड'ची ३३ हजार ४७८ कार्ड्सची विक्री झाली आहे. तर ३७ हजार ७२५ विद्यार्थी पास वितरित करून स्टुडंट कार्ड श्रेणीने प्रवाशांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट पासमुळे ३० टक्के सवलत

पुण्यात शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोने अत्यंत सोयीस्कर व परवडणारी ''वन पुणे स्टुडंट पास'' सेवा सुरू केली आहे. अवघ्या ५९ रुपयांमध्ये हा पास उपलब्ध असून, यामुळे प्रत्येक मेट्रो प्रवासावर तब्बल ३० टक्के सूट मिळणार आहे. हा पास विद्यार्थ्यांचा वेळ वाचवणारा, सुरक्षित प्रवासाची हमी देणारा ठरेल. जवळच्या मेट्रो स्टेशनला भेट देऊन हा पास मिळवावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थी पासचे मुख्य फायदे...

  • विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलतीच्या दरात मेट्रोप्रवास.

  • तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

  • कॅशलेस पेमेंट पद्धतीमुळे रोख रक्कम सोबत ठेवण्याची कटकट नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT