पुणे: अनंत चतुर्दशीच्या (विसर्जन मिरवणूक) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची (महामेट्रो) पुणे मेट्रो सेवा २४ तास अखंडित सुरू ठेवूनही प्रवासीसंख्येत सुमारे १० हजारांनी घट झाली. मात्र, तिजोरीत १६ लाख ६६ हजार रुपयांनी वाढ झाल्याची नोंद महामेट्रोने केली. यंदा दि. २५ सप्टेंबर सकाळी सहा ते २६ सप्टेंबर सकाळी सहा, या २४ तासांत ५ लाख ८० हजार ९४४ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यातून ८५ लाख ६१ हजार ८९५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ५ लाख ९० हजार २८० प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला होता. त्या वेळी ६८ लाख ९५ हजार ६५७ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. म्हणजेच, यंदा प्रवासीसंख्या १० हजार ६६४ ने घटली, तर उत्पन्नात २४.१९ टक्क्यांची वाढ झाली.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत पुणे मेट्रोला मात्र मोठा प्रतिसाद मिळाला. दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल ४८ लाख ३२ हजार ९१५ प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला असून, ७ कोटी ४९ लाख २८ हजार ३७७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत प्रवासीसंख्येत सुमारे ३० टक्क्यांची वाढ झाली. विसर्जनाच्या दिवशी महात्मा फुले मंडई स्थानक सर्वाधिक गर्दीचे ठरले. या स्थानकावर ७० हजार ३७५ प्रवाशांची नोंद झाली. त्यापाठोपाठ डेक्कन जिमखाना, स्वारगेट, पीसीएमसी आणि रामवाडी स्थानकांवर मोठी गर्दी झाली.
गणेशोत्सवात वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेट्रोची वारंवारता पाच मिनिटांवर आणण्यात आली होती. तसेच स्वारगेट, महात्मा फुले मंडई आणि डेक्कन जिमखाना स्थानकांवर वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक दिवस जास्त असूनही महामेट्रोला अपेक्षित प्रवासीसंख्या आणि उत्पन्न वाढवता आले नसल्याचे सरासरीतून स्पष्ट होते.
गेल्या दोन वर्षांतील आढावा
तपशील - २०२५-२०२६
अनंत चतुर्दशीचे प्रवासी - ५,९०,२८० - ५,८०,९४४
प्रवासी फरक - १०,६६४ घट
एका दिवसाचे उत्पन्न - ६८.९६ लाख - ८५.६२ लाख
कागदी तिकिटांकडे कल कायम
गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत ७१ टक्के प्रवाशांनी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब केला, तर २९ टक्के प्रवाशांनी कागदी तिकीट खरेदी केले. यामध्ये एकूण ८६ टक्के प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने (ऑनलाइन, यूपीआय पेमेंट) केले, तर १४ टक्के प्रवाशांनी रोख रकमेचा वापर केला, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
सर्वाधिक प्रवास या मार्गावरून
महात्मा फुले मंडई - ७०,३७५
डेक्कन जिमखाना - ६४,९३८
स्वारगेट - ४८,९०६
पीसीएमसी - ४३,४९१
रामवाडी - ३७,८९४
पीएमसी - ३६,५८८
वनाज - ३०,६८६
नळ स्टॉप - ३०,५१९
गरवारे कॉलेज - २६,८३२
छत्रपती संभाजी महाराज उद्यान - २३,३५०
पुणे रेल्वे स्टेशन - २०,१४९
गेल्या वर्षीच्या तुलनेत अनंत चतुर्दशीला प्रवासीसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. मात्र, यंदा १२ दिवस गणेशोत्सव असल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा ओघ दहा दिवसांत कायम होता. निश्चितच प्रवासीसंख्येत आणि उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. नागरिकांच्या सुलभ प्रवासाच्या दृष्टीने महामेट्रोचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो