Mental Health Pudhari
पुणे

Mental Health Treatment: मनोरुग्णांसाठी अचूक निदान, औषधोपचार व कुटुंबीयांचा आधार आवश्यक : तज्ज्ञ

विभक्त कुटुंबपद्धतीमुळे रुग्णांचा आधार कमी होत असल्याचे पुण्यातील चर्चेत मत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मनोरुग्णांसाठी नेमके निदान, प्रभावी औषधोपचार, समुपदेशन, स्वमदत आधार गट, कुटुंबीयांचा पाठिंबा आणि अचूक, पूरक उपचारपद्धती गरजेची असल्याचे मत ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे रुग्णांसाठी कुटुंबीयांचा आधार ढासळत चालल्याचे वास्तवही तज्ज्ञांनी पुढे आणले.

एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ आणि प्राज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फिनिक्स उपक्रमांतर्गत पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित चर्चात्मक संवादात अनेक तज्ज्ञांचा सहभाग होता. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा संवाद आयोजिण्यात आला होता.

या वेळी ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, प्राज फाउंडेशनचे विश्वस्त अनंत बवरे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. वासुदेव परळीकर, ‌‘सा‌’ संस्थेचे माजी अध्यक्ष अमृत कुमार बक्षी, एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल वर्तक आदी उपस्थित होते.

डॉ. विद्याधर वाटवे यांनी मनोरुग्णांसाठी शारीरिक पातळीवर प्रभावी औषधोपचारांचे महत्त्व सांगितले. मनोविकारग््रास्त रुग्णावरील उपचार एकच घटक करू शकत नाही. ते टीमवर्क असते. मनोविकारतज्ज्ञ, रुग्णाचे कुटुंबीय, समुपदेशक, समाजसेवक असे इतर घटकही महत्त्वाचे असतात. गेल्या 50 वर्षांत मनोविकारांवरील (सायकोफार्मोलाजी) अनेक औषधांचे संशोधन झाले असून, नवी औषधे विकसित झाली आहेत. मनोरुग्णांच्या भावना, आंदोलने स्थिर तसेच शांत ठेवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, असे ते म्हणाले.

डॉ. लुकतुके यांनी मनोरुग्णांवरील उपचारांमध्ये स्वमदत गटांचे साह्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. स्वतः स्वतःला मदत करायला शिकणे आणि त्यातून आत्मभान जागवणे, यासाठी रुग्णाला अनेक घटकांची एकत्रित मदत लागते. रुग्ण गोंधळलेला असतो. अशावेळी स्वमदत गट साह्यकारी ठरतात, असे ते म्हणाले. डॉ. वासुदेव परळीकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना या क्षेत्रात निदानाची आवश्यकता आणि निदानाच्या मर्यादा, यांचे भान जागे ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

सध्या आपण बुद्धी, भावना, संवेदना यांनाच मन समजतो की काय, अशी शंका वाटण्यासारखे वातावरण आहे. एकत्र कुटुंबात रुग्णासाठी घरातच पाठिंबा, मदत करणारे, समजून घेणारे हात होते. आता न्यूक्लीअर फॅमिलीमुळे कुटुंब ही संकल्पनाच बदलली आहे. मनोरुग्णावरील उपचार हा एकट्याने करायचा नसून, एकत्रितपणे करण्याचा प्रवास आहे.
डॉ. मोहन आगाशे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT