Maharashtra Sahitya Parishad  Pudhari
पुणे

Pune MASAP Election Controversy: ‘मसाप’ निवडणुकीवर राजकीय सावट? देशमुखांचे सोमणांना सवाल

स्वायत्तता आणि परंपरेबाबत प्रश्न; साहित्य वर्तुळात चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‌ ‘हा विजय नेमका कोणाचा..? तुमचा की भाजपचा..?, आता तुमची टीम स्वत: निर्णय घेणार की भाजपच्या कलाने कारभार करणार..?, ‌‘मसाप‌’सारख्या साहित्य संस्थेची स्वायत्तता टिकणार का..?‌’ असे विविध सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‌‘मसाप‌’चे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण आणि टीमला लिहिलेल्या पत्रातून उपस्थित केले आहेत.

पुण्यात होणाऱ्या आगामी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या आयोजनात संस्थेची परंपरा, स्वातंत्र्य आणि दर्जा जपला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. देशमुख यांनी लिहिलेल्या या पत्राची बुधवारी (दि. 18) दिवसभर साहित्य वर्तुळात चर्चा रंगली होती.

साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयाबद्दल सोशल मीडियावर विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशमुख यांनी योगेश सोमण आणि टीमला पत्र लिहून सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहेच; त्याशिवाय पत्राद्वारे काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. निवडणुकीनंतर काही भाजप नेत्यांनी केलेल्या सोशल मीडियावरील पोस्टचा उल्लेख करीत त्यांनी साहित्य संवर्धन आघाडीच्या विजयामागे राजकीय पक्षाचा प्रभाव असल्याचे म्हटले आहे.

तसेच, पत्राद्वारे देशमुख यांनी नवनिर्वाचित नेतृत्वाने आपल्या कृतीतून राजकीय हस्तक्षेपाबाबतच्या शंका दूर कराव्यात, असे आवाहन केले आहे. देशमुख यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, ‌‘मसाप‌’ निवडणुकीनंतर भाजपचे नेते राजेश पांडे आणि विनोद तावडे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे या विजयामागे राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विशेषतः या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांना दिल्याचा उल्लेख त्यांनी पोस्टमध्ये केला आहे. योगेश सोमणजी, साहित्य क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची टीम तुमच्याकडे असतानाही तुम्ही स्वतःच्या बळावर प्रचार न करता राजकीय मदतीचा आधार का घेतला? यामुळे नव्या नेतृत्वावर राजकीय शिक्का बसल्याची भावना निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT